सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : कोरोनाची आकडेवारी राज्याच्या कानाकोपऱ्यात आजही वाढत असून नवी मुंबई शहरही त्यास अपवाद राहीलेले नाही. आजही नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी कासगी रूग्णालये, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन उपलब्ध होत नसून रूग्णालयासह राजकारण्यांचेही उंबरठे कोरोना रूग्णांना व त्यांच्या घरच्यांनाही झिजवावे लागत आहेत. आज महापालिका प्रशासनाकडून कोरोनाग्रस्तांच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार नवी मुंबईत ३६१ रूग्ण आढळले असून ४२९ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब मानावी लागेल.
आतापर्यत नवी मुंबईत ६३ हजार ४१६ नवी मुंबईकरांच्या कोरोना तपसाण्या झाल्या असून त्यात २७,६७६ जणांच्या रॅपीड अॅटीजन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या ३५,७४० जणांचा यात समावेश आहे. आजच्या आढळून आलेल्या ३६१ कोरोना रूग्णांमध्ये बेलापूर विभागात ६३, नेरुळ विभागात ७५, वाशी विभागात ४२, तुर्भे विभागात ३१, कोपरखैराणे विभागात ४६, घणसोली विभागात ५०, ऐरोली विभागात ४४, दिघा विभागातील १० कोरोना रूग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचा आकडा वाढत असला तरी कोरोनाच्या विळख्यातून मुक्त झालेल्यांचे प्रमाणही चांगले आहे. मार्चच्या तुलनेत ऑगस्टच्या सुरूवातीला कोरोना आजाराबाबत नवी मुंबईकरांमध्ये भीती आता राहीलेली नाही. लॉकडाऊन कागदावर राहीले असून नवी मुंबईतील अनेक विभागामध्ये व्यवहारही सुरळीत होवू लागले आहेत. अनेकदा मॉस्कही चेहऱ्यावर नसतानाही नवी मुंबईकर फिरताना दिसत आहे. कोरोना काळात नवी मुंबई शहरात अनधिकृत फेरीविक्रेत्यांचीही संख्या वाढीस लागली आहे.