दिपक देशमुख
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजी मार्केटमधील वास्तव
नवी मुंबई : दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबईसह नवी मुंबईलाही बसल आहे. त्यासोबतच नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटलाही याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात भाजीपाल्यांच्या दरात ७० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे भाज्या आता स्वस्त झाल्या असल्या तरी किरकोळ बाजारात मात्र मोठ्या चढ्या भावाने विविध प्रकारच्या भाज्या किरकोळ व्यापारी विकत आहेत.त्यातच श्रावण महिना असल्याने नागरिकांचा ओढा भाज्याकडे असल्याने किरकोळ भाजी विक्रेते गब्बर झाले आहेत.दरम्यान एपीएमसी बाजारात ५० टक्के माल अजूनही शिल्लक राहिला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
मुसळधार पाऊस सुरू झाल्या पासून दिवसात कोबीचा भाव ३ रुपये किलो, टोमॅटो ५ ते १० रुपये किलो, पडवळ ८ रुपये किलो, फरसबी १२ रुपये किलो, वांगी ५ ते १० रुपये किलो, दुधी ७ ते ९ रुपये किलो,लालभोपला ५ ते ७, भेंडी १५ ते १८, भेंडी क्र. २ १० ते १२, फ्लॉवर ५ ते ८, तोंडली व पडवळ ८ ते १०, ढोबळी मिरची १० ते १५ व कारली ८ ते १० रुपये या बाजारभावाने विकल्या जात आहेत. पण हीच भाजी नवी मुंबईमधील किरकोळ बाजारात मात्र चार ते सहा पट जादा भावाने विकली जात आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने व्यापारी खरेदी करत आहेत. पण तीच भाजी किरकोळ व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर विकताना ग्राहकाकडून चांगलाच नफा कमवत असल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मात्र आपले येण्याजण्याचे भाडे मिळणेही दुरापास्त झाले आहे.