नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये गणेशोत्सवाकरिता गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी तीन कृत्रिम तलाव तातडीने बनविण्याची मागणी प्रभाग ७६ मधील भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोनाचा काळ असून नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात आजही कोरोना रूग्ण मोठ्या संख्येने पहावयास मिळत आहे. कोरोनावर नियत्रंण मिळविण्यासाठी पालिका प्रशासन करत असलेले कार्य अभिनंदनीय व प्रशंसनीय आहे. सानपाडा हा नोड मराठी भाषिक बहूल परिसर आहे. येथे सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सव उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. येथील गणेश मुर्ती विसर्जित करण्यासाठी सानपाडावासिय वाशीत, जुईनगर येथील चिंचोली तलावाकडे तर काही प्रमाणात करावेकडील तलावाकडे जात असतात. कोरोना पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीचे विसर्जन करत असलेल्या तलावांवर यंदा गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आता काळाची गरज आहे. गणेश विसर्जनप्रसंगी तलावावर जमणारी गर्दी कोरोना वाढीला हातभार लावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पांडूरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
सानपाडा परिसरात सेक्टर ८ मध्ये हुतात्मा बाबू गेनू क्रिडांगण, सेक्टर ३ मध्ये स्वातंत्र्यसैनिक ज्योतिबा पन्हाळकर क्रिडांगण, सेक्टर २ येथे ओरिएण्टंललगतचे क्रिडांगण आहे. या ठिकाणी पालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव बनविल्यास सानपाडावासियांना घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी बाहेर कोठेही जावे लागणार नाही. घराजवळच विसर्जन स्थळ उपलब्ध होईल. अन्य पारंपारिक तलावांवरही गर्दीचे प्रमाण कमी होईल. गणरायाच्या आगमनाला अजून १३ दिवसाचा कालावधी अहो. पालिका प्रशासनाला कृत्रिम तलाव बनविण्यासाठी ३ ते ४ दिवसाचा कालावधी पुरेसा आहे. आपण कोरोना पार्श्वभूमीवर सर्व बाबींचा विचार करून संबंधितांना या ठिकाणी कृत्रिम तलाव लवकरात लवकर बनविण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी पांडूरंग आमले यांनी केली आहे.