सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : कोपरखैराणे नोडमध्ये महापालिका प्रभाग ४२ मधील उद्यानाची न झालेली सफाई व एका ठिकाणी नाल्यात न झालेली पावसाळीपूर्व कामांची स्वच्छता या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रभाग ४२ मधील समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी भाजप कार्यकर्त्या व समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महानगरपालिका प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर २३ मध्ये प्लॉट क्रं ६ वर, सिडकोनिर्मित श्री. वसुंधरा सोसायटी आहे. या सोसायटीच्यासमोर महापालिकेचे छोटेखानी उद्यान आहे. मागील काही काळापासून या उद्यानाची महापालिका प्रशासनाकडून सफाई झालेली नाही. या उद्यानामुळे परिसराला बकालपणा आला आहे. तिथे अधूनमधून रहीवाशांना साप व नागाचे दर्शनही होत आहे. त्या उद्यानात पालापाचोळा, फांद्या पडल्या असून पावसात त्या उद्यानातून काळे पाणी बाहेर येत असते. उद्यानातील अस्वच्छतेमुळे स्थानिक रहीवाशांना डासांचाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू आदी साथींच्या आजाराचा उद्रेक होण्याची भीती आहे. आपण स्वत: समस्येचे गांभीर्य समजून घ्या. या उद्यानाची लवकरात लवकर सफाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे बकालपणा नाहीसा होईल. डासांचा त्रासही कमी होईल. स्वच्छता राहील. अडगळ गेल्याने नाग-सापांचे दर्शनही होणार नाही. उद्यानातील अस्वच्छतेमुळे आपण संबंधितांना उद्यानात युध्दपातळीवर स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.
महानगरपालिका प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर २२ मध्ये प्लॉट क्र ३, सिडकोनिर्मित श्री ही गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगतच पालिकेचे उद्यान व एक नाला आहे. पावसाळीपूर्व कामांतर्गत या नाल्याची यंदा पालिका प्रशासनाकडून स्वच्छता झालेली नाही. या नाल्यात कचरा तुंबलेला असतो. स्थानिक रहीवाशांना या जीवघेण्या नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच नाल्यामुळे डास वाढीस लागले आहेत. स्थानिक रहीवाशांना नाग-सापाचे दिवसाआड दर्शनही होत आहे. उंदरांचाही उपद्रव वाढल्याने उंदिर खाण्यासाठी साप आता सोसायटी आवारातही येवू लागले आहेत. या नाल्याची सफाई करण्याचे, कचरा काढण्याचे आपण संबंधितांना आदेश द्यावेत. अपाण स्वत: श्री सोसायटीतील रहीवाशांशी चर्चा केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य समजून येईल, लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.