
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कामगारांना वेळेवर वेतन देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात कंत्राटी तत्वावर मूषक नियत्रंण कामगार काम करत आहेत. गेली अनेक वर्षे मूषक नियत्रंण कामगार प्रशासनात काम करूनही त्यांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. या मूषक नियत्रंण कामगारांची वेतन मिळण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक ससेहोलपट पालिका प्रशासनाकडून होत आहे. अनेकदा दोन ते तीन महिने विलंबानेच या मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन होत असते. कोरोना काळातही हे मूषक नियत्रंण कामगार अहोरात्र दिवसाउजेडी तसेच रात्री-मध्यरात्री आपले मूषक नियत्रंणाचे काम इमानेइतबारे कऱत आहेत. कालच त्यांचे (दि.१९ ऑगस्ट) रोजी जुलै महिन्याचे वेतन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. अन्य कोणत्याही कायम कामगारांचे-अधिकाऱ्यांचे तसेच कंत्राटी अथवा ठोक मानधनावरील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वेतनाबाबत कधीही विलंब होत नाही. दोन-तीन महिने वेतन रखडले जात नाही.अथवा १९ तारखेपर्यत विलंबही होत नाही. मग मूषक नियत्रंण या एकमेव संवर्गाच्या बाबतीत वेतन विलंबाचा का प्रकार होत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. मूषक नियत्रंण कामगारांनी कामात चुकराई केली तर नवी मुंबईकरांना पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या आजाराचाही सामना करावा लागण्याची भीती आहे. आपण स्वत: मूषक नियत्रंण कामगारांशी वेतन विलंबाबाबत चर्चा केल्यास आपणास त्यांच्यावर वेतनप्रकरणी होत असलेल्या अन्यायाची कल्पना येईल व महागाईच्या काळात दोन ते तीन महिने वेतन थकणे असेही झालेले प्रकार आपल्या निदर्शनास येतील. आपण स्वत: याप्रकरणी लक्ष घालून मूषक नियत्रंण कामगारांचे वेतनास विलंब होणार नाही, यासाठी आपण संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी अशोक गावडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.