
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता येथे अॅण्टीजेन टेस्ट अभियान राबविण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रय नांगरे यांच्याकडे केली आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि सेक्टर १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पालिका प्रशासनाला नव्याने सांगण्याची गरज नाही. परिसरातील रहीवाशांमध्ये अजूनही कोरोना आजाराबाबत भीती व गैरसमज कायम आहे. कोरोनाबाबत जनसामान्यांना प्रबोधन करण्यास व वस्तूस्थितीवर आधारित माहिती देण्यास पालिका प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न झालेले नाहीत, हेही यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते. रहीवाशांना वारंवार माहिती देवूनही कोरोना टेस्ट करून घेण्यास रहीवाशी तयार होत नाहीत. कारण टेस्ट केल्यावर अहवाल हा पॉझिटिव्हच येतो, असा जनसामान्यांचा समज झालेला आहे. याबाबत आम्ही घरटी जावून आमच्या परिने लोकांची सेवा आणि प्रबोधन करत आहोत. पालिका प्रशासनाच्या वतीने प्रभागात अॅण्टीजेन टेस्ट अभियान राबविल्यास आम्ही तुम्हाला सहकार्य करू. घराघरात जावून टेस्ट करून घेण्यासाठी रहीवाशांना प्रवृत्त करू. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाला आमच्या प्रभागात जे जे उपक्रम राबवयाचे असतील त्यासाठी आम्ही सहकार्य करू. कोरोनाचा उद्रेक कमी होवून आता अस्तित्व कोठेतरी संपले पाहिजे. पालिका प्रशासनाने प्रभाग ९६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट अभियान लवकरात लवकर सुरू करावे,अशी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.