
· मनसेचा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना इशारा
· खाजगी हॉस्पिटलच्या लूटमारी विरोधात मनसे आक्रमक
नवी मुंबई : नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलच्या लुटमारी विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली पहावयास मिळाली. यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने लेखी निवेदन दिले. रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारून त्यांची आर्थिक लूट करत असलेल्या खाजगी हॉस्पिटलवर येत्या सात दिवसांत तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन पुरस्कार देण्याचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना यावेळी दिला. त्याचप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे वाशीतील ‘हिरानंदानी फोरटीज’ हॉस्पिटलच्या मुजोरी विरोधात यावेळी तक्रारी केल्या.
नवी मुंबई महानगरपालिका खाजगी हॉस्पिटलवर मेहेरबान असल्याचा आरोप शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून करण्यात आला. नवी मुंबई मनपाने अद्याप एकाही खाजगी कोविड हॉस्पिटलवर गुन्हा दाखल केला नाही, एकाही खाजगी हॉस्पिटलची मान्यता रद्द केली नाही, तसेच खाजगी हॉस्पिटलने रुग्णांकडून ज्यादा आकारलेले बिल अद्यापपर्यंत नातेवाईकांना परत केले नाही असे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदन पत्रात नमूद केलेले आहे. यावेळी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह निलेश बाणखेले, विनोद पार्टे, सविनय म्हात्रे, नितीन खानविलकर, विलास घोणे, रुपेश कदम, दिनेश पाटील, आप्पासाहेब कोठुळे, सनप्रित तुर्मेकर, सागर नाईकरे, योगेश शेटे, मयुर चव्हाण, विराट शृंगारे, संदेश डोंगरे, अनिकेत पाटील, किरण काकेकर, प्रतिक खेडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.