
सुजित शिंदे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत नवी मुंबई कार्यक्षेत्रात कॉंग्रेस पक्षाला मरगळ आलेली आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्या नेतेमंडळींच्या सभोवताली वावरणाऱ्या कॉंग्रेसमध्ये सध्या कार्यकर्त्यांचाही दुष्काळच आहे. त्यातच २ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने नवी मुंबई युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर केल्यानंतर कॉंग्रेस वर्तूळात असंतोष उफाळून आला आहे. ज्याची नियुक्ती केली तो माणूस पक्षाने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आला नाही, पक्षात कार्यरतही नाही, नवी मुंबई युवक कॉंग्रेसमध्ये सक्रिय नाही त्या माणसाला थेट नवी मुंबई अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. दोन दिवसापासून सोशल मिडियावर महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांकडून तोंडसुख घेतले जात आहे. कॉग्रेसमध्ये तळागाळात कार्य करणाऱ्यांना नाही तर वरच्या नेतेमंडळींशी संपर्क करणाऱ्यांना न्याय मिळतो असा संताप युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जावू लागला आहे.
कॉंग्रेस पक्षाने राज्यात ठिकठिकाणी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी निश्चित करण्यासाठी मुलाखत कार्यक्रम निश्चित केला होता. त्या मुलाखती कोणत्या दिवशी होणार व मुलाखतीस कोण कोण पदाधिकारी येणार हेही युवक कॉग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून जाहिर करण्यात आले होते. नवी मुंबई युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ठरविण्यासाठी २७ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी विजय बाबूशेठ पाटील, पंकज जगताप, शार्दूल कौशिक, रवी जाधव या इच्छूकांकडून नवी मुंबई युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छूक मंडळींनी मुलाखतीही दिल्या. युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस ब्रिजकिशोर दत्त, अभिजित शिवरकर, चिटणिस प्रिया पवार यांनी या मुलाखती घेतल्या. त्यानंतर २ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसकडू नवी मुंबई युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड जाहिर केल्याने नवी मुंबई कॉंग्रेसमध्ये संताप व्यक्त केला जावू लागला आहे. . ज्याची नियुक्ती केली तो माणूस पक्षाने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आला नाही, पक्षात कार्यरतही नाही, नवी मुंबई युवक कॉंग्रेसमध्ये सक्रिय नाही त्या माणसाला थेट नवी मुंबई अध्यक्षपदाची धुरा देण्यात आल्यामुळे युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर नवी मुंबई युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तोंडसुख घेतले जात आहे. अनेकांनी सोशल मिडियावरही आपला संताप व्यक्त करत सत्यजित तांबेवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका आता तोंडावर आल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असली तरी नवी मुंबईत कॉंग्रेसला १० ते १२ जागाव्यतिरिक्त अन्य जागा सोडण्यास शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस तयार नाही. त्यातच प्रदेश कॉंग्रेसने नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष ठरविताना केलेला घोळ कॉंग्रेस पक्षातील युवक कॉंग्रेस संपविण्यासाठी हातभार लावण्यास मदत करणार असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उघडपणे केला जात आहे.
मुलाखत दिलेले विजय बाबूशेठ पाटील, पंकज जगताप, शार्दूल कौशिक, रवी जाधव हे चारही जण नवी मुंबई युवक कॉंग्रेसमध्ये गेल्या काही वर्षापासून सक्रिय आहेत. विजय पाटील हे तुर्भ्याचे युवा ग्रामस्थ आहेत. पंकज जगताप हे कॉग्रेसचे मातब्बर नेते भाई जगतापांचे पुतणे आहेत. शार्दूल कौशिक हे विद्यमान जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचे पुत्र आहेत. रवी जाधव हे बेलापुरचे कार्यकर्ते आहेत. काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने राज्यभर भाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलने केली. त्यात कॉंग्रेसच्या युवकांनी बेलापुर येथे भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या घरासमोर निदर्शने केली. त्यात विजय बाबूशेठ पाटील, पंकज जगताप यांचाही पुढाकार होता.
कॉंग्रेस नवी मुंबईमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करत असतानाच युवक कॉग्रेसमध्ये नवी मुंबईत सक्रिय नसणारे व वरून लादलेले नेतृत्व आल्यास उरली सुरली युवक कॉग्रेसही संपविण्याची सत्यजित तांबे यांनी सुपारी घेतली काय असा संतापही युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. सत्यजित तांबे यांच्यावरील राग सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होवू लागल्याने नवी मुंबईतील युवक कॉंग्रेसची नियुक्तीने सत्यजित तांबे वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे. विविध आरोप तांबेवर व्यक्त होताना नियुक्तीप्रकरणी वेगळाच संशयही व्यक्त केला जावू लागला आहे. युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये वयाची पस्तिशी उलटून गेल्यावर पदे मिळत असल्याने या पदामागेही अर्थकारणाच्या उलाढालीचा आरोप होत असून राज्यातील पक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या युवकांना तांबे कधी संधी देणार अशी विचारणाही केली जावू लागली आहे.