
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : सारसोळे स्मशानभूमीत यापुढे बाहेरील भागातील कोरोना रोगाने मयत झालेले मृतदेह अंत्यविधीसाठी आणल्यास व अंत्यविधीसाठी दबाव आणण्याचा तसेच स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्यास मृतदेह घेवून येणाऱ्या रूग्णवाहिकेच्या चारही चाकातील हवा यापुढे सोडून देणार असल्याचा इशारा सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व महापालिकेतील माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
कोरोना रोगाची सुरूवात झाल्यापासून नवी मुंबई शहरामध्ये कोरोना मृतदेहांवर अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी निर्माण करण्यात यावी यासाठी मी स्वत: गेली सहा महिने नवी मुंबई महापालिका व मंत्रालयदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहे. सुरूवातीच्या काळात कोरोनाने कोणी मृत झाल्यास अंत्यविधीसाठी सारसोळेच्या स्मशानभूमीत आणले जात असे. विशेष म्हणजे स्थानिक स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यावर नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना दमदाटी करून अंत्यविधी करण्यासाठी दबाव आणत असतात. सारसोळेच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यावर बाहेरील कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सारसोळेच्या ग्रामस्थांनी विरोध करण्यास सुरूवात केली. अगदी सारसोळेच्या स्मशानभूमीला टाळे ठोकून समस्येच्या गांभीर्याकडे सर्वाचेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्या व महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे डीवायपाटील व इतर रूग्णालयात कोणी कोरोनाने मृत पावल्यास डॉक्टर व तेथील पालिका अधिकारी सारसोळेच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मृतदेह पाठवून देत आहेत. सारसोळे ग्रामस्थांचा विरोध नेरूळ नोडमधील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नसून बाहेरील भागातील कोरोनाने मृत झालेल्या मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास आहे. यापुढे बाहेरील भागातील कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास कोणी दमदाटी केल्यास अथवा राजकीय तसेच प्रशासकीय दबाव आणल्यास आम्ही सारसोळेचे ग्रामस्थ त्या रूग्णवाहिकेच्या चारही चाकातील हवा काढून टाकणार असल्याचे कळविण्याकरिता आपणास हे निवेदन सादर करत आहोत. नवी मुंबईत केवळ सारसोळे ग्रामस्थच आपल्या स्मशानभूमीत बाहेरील लोकांना अंत्यविधी करू देत आहेत. सारसोळे ग्रामस्थांच्या संयम व सहनशीलतेचा अंत पाहू नका. ही स्मशानभूमी सारसोळे ग्रामस्थांकरिता आहे. बाहेरील कोरोना मृतदेह पाठविण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यापुढे अन्य गावातील स्मशानभूमीप्रमाणेच सारसोळे गावच्या या स्मशानभूमीतही बाहेरील कोणत्याही मृतदेहावर आम्ही अंत्यसंस्कार करू देणार नाही याची आपण नोंद घ्यावी व महापालिका प्रशासनातील संबंधितांना सारसोळे गावच्या स्मशानभूमीत बाहेरील कोणत्याही भागातील कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून देणार नसल्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.