
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
मुंबई : कंगना रणौतने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला असून कंगनाला शेलक्या शब्दांत सुनावले आहे. कोणाही ‘टॉम डिक आणि हॅरीने’ मुख्यमंत्र्यांचा केलेला अनादर स्विकारार्ह नाही, असा टोला त्यांनी कंगनाला लगावला आहे. ट्विट करुन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार जलील म्हणाले, “शिवसेना आणि आमच्यामध्ये राजकीय मतभेद असतील मात्र उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणाही टॉम डिक आणि हॅऱीनं त्यांचा अनादर करणे हे अस्विकारार्ह आहे. कंगनाने तिच्या भाषेवर नियंत्रण ठेवायला हवे.”
अभिनेत्री कंगना रणौतने आज मुंबईत पोहोचताच ट्विटरवरुन व्हिडीओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला. महत्त्वाचं म्हणजे कंगनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्या दिल्या जात आहेत असं सांगितलं होतं. तसंच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आवाहन दिले होते. यानंतर बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली.
कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेर उल्लेख केल्याने तिच्यावर आता टिकेचा भडिमार होत असून जलील यांनी याप्रकरणी राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे.