
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील नेरूळ पश्चिम नोडमधील प्रभाग ८५ व ८६ मध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून येणाऱ्या दुकानांना आर्थिक दंड न लावता संबंधित दुकाने सील करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई शहरातील महापालिका प्रभाग ८५ व ८६ मधील सारसोळे गाव, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील दुकानांमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या सामान घेवून जाण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणलेली असतानाही किराणा मालाच्या तसेच अन्य दुकानांमध्ये खुलेआमपणे प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध होत आहेत. अशा वेळी महापालिका प्रशासनाचे नेरूळ विभाग कार्यालयाची भूमिका सर्वसामान्यांना संशयास्पद वाटत आहे. प्रभाग ८५ व ८६ मधील ज्या ज्या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून येतील ती दुकाने महापालिका प्रशासनाकडून सील करण्याची कारवाई करण्यात यावी. आर्थिक दंड कितपत लावला जातो, याबाबतही संशय कायम असून प्रश्नचिन्ह आहे. प्रभाग ८५ व ८६ मध्ये महापालिका प्रशासनाने सातत्याने प्लास्टिकविरोधी मोहीम राबवून हा परिसर प्लास्टिकमुक्त करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आदेश देवून सहकार्य करावे. प्लास्टिक पिशव्या आढळून येणाऱ्या दुकानांना सील लावल्यास कोणताही दुकानदार प्लास्टिक पिशव्या ठेवण्याचे धाडस दाखवणार नाही आणि परिसरही प्लास्टिक पिशव्यांतून मुक्त होईल. याप्रकरणी संबंधितांना प्लास्टिक पिशव्या आढळून येणाऱ्या दुकानांना सील करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका प्रशासनाला देवून प्रभाग ८५ व ८६ प्लास्टिक पिशवी मुक्त करण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.