
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : पामबीच मार्गालगत असलेल्या ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ची दुरावस्था तातडीने दूर करण्याची मागणी समाजसेवक हरेश भोईर यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबईचे सौदर्य वाढविणाऱ्या स्थळांमध्ये नेरूळ पामबीच मार्गालगत ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’आहे. या ठिकाणी सकाळी व सांयकाळी शेकडोच्या संख्येने आजूबाजूच्या परिसरातील महिला, पुरूष, मुले, ज्येष्ठ नागरिक फिरावयास येत असतात. या ठिकाणी असणारे पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. या ठिकाणी सांयकाळनंतर अंधार पडत असल्याने चोरी, वाटमारी, लुटमारी होण्याची भीती आहे. तसेच पायी फिरण्यासाठी येणाऱ्या महिला, तरूण मुलींवर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा उचलत विनयभंग, अत्याचार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने येथे कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना तातडीने नादुरूस्त पथदिवे दुरूस्त करण्याची व सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावे. उद्या कोणताही अनैतिक प्रकार घडल्यास, छेडछाड, विनयभंग, अत्याचाराची घटना घडल्यास, वाटमारी, लुटमार झाल्यास या प्रकारास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा हरेश भोईर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.