
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : भाजपचे माजी नगरसेवक व महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी महामारी आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पालिका प्रशासनाच्यावतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून यामुळे राजकीय समारंभ करण्यास एपीडिमिक ऍक्ट मधील तरतुदीनुसार बंदी आहे. मात्र माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन करत रुग्णांना फळ वाटप केले. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दीदेखील दिसत आहे.(सोबत छायाचित्र जोडत आहे.) स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालय नेरूळ येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी केलेले हे कृत्य बेकायदेशीर असून यापूर्वीही टाळेबंदी असताना नियम झुगारून ते प्रभात फेरीसाठी गेले होते म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली आहे. त्यांनी पुन्हा एकदा रुग्णालयात आंतर रुग्ण विभागात राजकीय फायद्यासाठी फळांचे वाटप करून नियमबाह्य कृत्य केले आहे.यासाठी त्यांना परवानगी होती का ? नसेल तर मग त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करावी .भाजप वॉर्ड क्रमांक १०० च्या वतीने त्यांच्या नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी हे फळ वाटप केले आहे.कोविडच्या या गंभीर स्थितीत त्यांच्या या राजकीय कार्यक्रमाची फळ रुग्णांना भोगावी लागू शकतात. फळ वाटप करताना लहान बालकही या आंतर रुग्ण कक्षात दिसत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग बळावल्यास याला जबाबदार कोण हा सवाल यानिमित्ताने समोर येत आहे.आज रवींद्र इथापे यांनी हा उपक्रम राबवल्याने उद्या आणखी इतर नेत्यांनी जर असेच उपक्रम घेतले तर याचे गंभीर परिणाम आरोग्य विभाग आणि रुग्णांना भोगावे लागू शकतात.हा चुकीचा पायंडा पडू नये म्हणून त्यांच्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.