
ऐरोली स्थानकात रेल्वे न थांबण्याचे विचारले कारण
नवी मुंबई : हार्बर रेल्वे सेवा विभागाच्या वतीने नवी मुंबईत काही अंशी अत्यावश्यक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू केली खरी. परंतु महत्वाच्या अशा ऐरोली रेल्वे स्थानकात रेल्वेला थांबा दिला नसल्याने कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. याकडे रेल्वेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे नवी मुंबई उप शहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी त्यांनी आमदार,खासदार व पालक मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. दरम्यान, ऐरोली येथे रेल्वे थांबावी म्हणून रीतसर कोपरखैरणे येथील रेल्वे स्थानकात जाऊन स्टेशन मास्तरांना निवेदन देण्यात आले व ऐरोली येथे येऊन आंदोलन केले.
सध्या ठाण्याहून रेल्वे सुटली की ती थेट रबाले स्थानकात थांबते. परंतु ऐरोली परिसरात असणाऱ्या आयटी कंपन्या,औद्योगिक क्षेत्र, रूग्णालये, मनपा कार्यालयात येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याना याचा मोठा त्रास, याशिवाय आर्थिक नुकसान देखील होत आहे. तसेच ऐरोली रेल्वे स्थानक लगत व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना सुद्धा प्रवाशी मिळत नसल्याने त्यांची आर्थिक घडी विसकटली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना रबाले येथे उतरल्यानंतर रिक्षा किंवा बसने ऐरोली मध्ये यावे लागते असल्याने ऐरोली स्थानकात बस थांबणे गरजेचे असल्याचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी सांगितले.
नवी मुंबईचे खासदार राजन विचारे व पालकमंत्री एकनाथ शिंदे हे नवी मुंबईत विविध समस्या सोडविण्यासाठी येतात. परंतु त्यांना ऐरोली रेल्वे स्थानकाचा प्रश्न दिसत नाही का?असा सवाल उपस्थित करून खासदार पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाला येतात. त्यांना नवी मुंबईमधील मच्छी चांगलीच आवडते. मच्छी खायलासुद्धा येतात. परंतु त्यांना नागरिकांच्या समस्या दिसत नसल्याची टीका देखील खासदारावर निलेश बाणखेले यांनी केली.
या आंदोलनात निलेश बाणखेले यांच्या बरोबर चंद्रकांत डांगे, विश्वनाथ दळवी, प्रविण घोगरे, संतोष जाधव, नितीन लष्कर, सखाराम सकपाळ, महेश कदम, जमीर पटेल, प्रेम दुबे व निखिल थोरात आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.