
नवी मुंबई : नवी मुंबईतील सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या गलथानपणाकडे लक्ष देवून कडेकोट सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून (मेलच्या माध्यमातून) केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे हे कोरोनाग्रस्त झाल्याने रूग्णालयात उपचार घेत असले तरी नवी मुंबईतील समस्यांबाबत मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करताना त्यांना आजार व उपचार याहून नवी मुंबईतील समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्याचे कृतीतून दाखवून दिले आहे.
२००८ साली सागरी मार्गाने झालेल्या २६/११च्या कसाब व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मुंबईवरील हल्ल्यामुळे सागरी सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. त्या घटनेतून बोध घेवून राज्यातील सर्वच सागरी किनारे, खाडी किनारे यांच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक होते. तथापि ते अद्यापि झालेले नाही. मुंबईलगतच असलेल्या नवी मुंबईचे महत्व लक्षात घेता व चहूबाजूने नवी मुंबईला लाभलेला खाडीकिनारा पाहता नवी मुंबई शहराच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कोठूनही समाजविघातक शक्ती सागरी मार्गाने नवी मुंबईत येवून रायगड, मुंबई, ठाण्यात गोंधळ घालण्याची टांगती तलवार आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील सागरी सुरक्षा व्यवस्थेबाबत निदर्शनास आलेल्या काही बाबी अशोक गावडे यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर निर्माण झालेल्या या नवी मुंबई शहरात ऐरोली-दिवा, तळवली, घणसोली, गोठीवली, कोपरखैराणे, वाशीगाव, सागर विहार, वाशीस्टेशन होल्डींग पॉड(दिवाळे-मानखुर्द), सारसोळे, करावे (चाणक्य), नेरूळ (शिवमंदिर), करावे (एनआरआय), दिवाळा (तीन ते चार जेट्या), बेलापुर अशा विविध ठिकाणी सागरी जेट्या व खाडी किनारे आहेत. येथे आपण कधीही न सांगता भेट द्या. सागरी सुरक्षा व्यवस्थेतील गलथानपणा आपल्या निदर्शनास येईल. या ठिकाणच्या अनेक जेटी, होल्डिंग पॉण्ड तसेच खाडी किनाऱ्यावर आपणास पोलिस तसेच सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई – ठाणे जिल्हा, सानपाडा बोर्डचे सुरक्षा रक्षकही दिसून येत नसल्याचे अशोक गावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
ज्या जेटीवर सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई – ठाणे जिल्हा, सानपाडा बोर्डचे सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधल्यास आपणास त्यांच्याही अडचणी निदर्शनास येतील. आजमितीला या सुरक्षा रक्षकांचे नेहमीच वेतन थकीत असते. त्यांना जेटीवर बसण्यासाठी साधी केबिनही नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही, पंखाही नाही. दिवसा अथवा रात्री-अपरात्री कोणत्याही दगडावर अथवा जमिनीवर अथवा रॅबिट-डेब्रिजच्या ढिगाऱ्यावर बसलेले पहावयास दिसून येतील. या सुरक्षा रक्षकांकडे कोणतेही शस्त्र नाही. रात्री-अपरात्री समाजविघातक अपप्रवृत्तींनी हल्ला केल्यास या सुरक्षा रक्षकांना खाडीचे, जेटीचे सोडा, पण स्वत:चे रक्षण करता येणार नाही, इतकी भयावह स्थिती असल्याचे अशोक गावडे यांनी निवेदनातून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
नवी मुंबईकरांच्या, मुंबईकरांच्या, ठाणेकरांच्या जिवित रक्षणासाठी नवी मुंबईतील खाडीकिनारे, जेटी या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे. सुरक्षा रक्षकांना सुविधा व हत्यारे पाहिजेत. तसेच केबिन, पिण्याचे पाणी, लाईट, पंखे आदी मिळाले पाहिजे. नवी मुंबईचे खाडी किनारे तसेच सागरी मार्ग आज पूर्णपणे असुरक्षित आहेत. धोका स्पष्टपणे दिसत आहे. समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास आणून देण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे केलेले आहे. आपण तातडीने निर्णय घेवून नवी मुंबईच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी अशोक गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.