
Navimumbailive.com@gmail.com-9820096573
उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून हाथरस घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने जुईनगर येथील चिंचोली तलावात उतरून आगळेवेगळे सत्याग्रह आंदोलन केले.
या सत्याग्रह आंदोलनात प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, शेवंता मोरे, तुकाराम महाराज, दिनेश गवळी, स्वप्नील दरेकर, रामचंद्र माने, बागडे, वाघ, मनीष महापुरे, राजेश भंबुरे सहभागी झाले होते. या आंदोलनात कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत स्थानिक रहीवाशांचे हाथरसच्या घटनेकडे लक्ष वेधून घेतले. जुईनगरमधील पालिकेच्या चिंचोली तलावात उतरून पाण्यामध्ये कॉंग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन नवी मुंबईत चर्चेचा विषय बनले असून प्रदेश कॉंग्रेसकडूनही या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे.