
नवी मुंबई : प्रवासाचा ताण पाहता जलवाहतूक एक प्रभावी पर्याय म्हणून आणि महापालिकेस ३२ किमी लांबीचा खाडीकिनारा उपलब्ध असल्याने त्याचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापर करता येईल असा अहवाल ठाणे महानगरपालिकेने २०१६ साली केंद्राकडे सादर केला होता. यामध्ये वसई -ठाणे – कल्याण हा ५४ किमी लांबीचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून यामध्ये १० ठिकाणी जेट्टी बांधून सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ठाणे – मुंबई व ठाणे – नवी मुंबई या दोहो जलवाहतूक मार्गाचे देखील नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे – मुंबई १० ठिकाणी व ठाणे – नवी मुंबई ८ ठिकाणी जेट्टींचा समावेश आहे. आणखी ज्याप्रकारे मुंबई मांडवा फेरी व रोरो सेवा सुरु आहे. तसेच नवी मुंबई – मांडवा व नवीमुंबई ते गेट वे आफ इंडिया (मुंबई) हा मार्ग प्रस्तावित आहे.
सोमवारी, ०५/१०/२०२० रोजी केंद्रीय जल बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी महाराष्ट्रातील अंतर्गत जलवाहतूक विकास कामांच्या प्रगतीबाबत ऑनलाईन बैठक घेतली. सदर चर्चेमध्ये माननीय खासदार श्री राजन विचारे साहेबांनी ठाणे, मुंबई नवी. मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा भाईंदर व भिवंडी या ७ महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहतूक मार्ग क्रमांक ५३ ठाणे-मुंबई, ठाणे-नवी मुंबई या दोहो मार्गाबाबत माहिती देताना ठाणे महानगरपालिका देशभरातील प्रथम महानगरपालिका आहे. ज्या महापालिकेने सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून सविस्तर प्रकल्प अहवाल खासदार राजन विचारे, कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे व ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर करून संबंधित प्रकल्प लवकरात लावकर मान्य करून सुरु करण्याची विनंती केली. त्यावर माननीय केंद्रीय मंत्र्यांनी या कामी दुजोरा देताना मला या सर्व प्रकल्पाचे सादरीकरण आपणाकडून झाले आहे व महाराष्ट्रातील जल मार्ग विकास प्रकल्पांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने निधी उपलब्ध होणार असून केंद्र शासनामार्फत महाराष्ट्रासाठी केंद्रीय निधी राखून ठेवला आहे असे सांगितले यातून वरील जलमार्गातील जेट्टीचे काम होणार आहे व संचलनाचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये ऑपरेटरची नियुक्ती करून राज्य शासनामार्फत करण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील या जलमार्गावर पुढील पावसाळ्यापूर्वी म्हणजेच जून २०२१ पूर्वी सर्व सुविधांसह फेरीबोट सुरू होणार असे केंद्रीय जल बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीयानी खासदार राजन विचारे यांना आश्वासन दिले आहे.
या चर्चेत खासदार राजन विचारे यांनी हेसुद्धा निदर्शनास आणून दिले कि, नवी मुंबई येथील नेरूळ जवळ जेट्टी बांधकाम सुरू असून मांडवा ते मुंबई या धर्तीवर मांडवा ते नेरूळ फेरी सुरू करणे बाबत केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा अशी सूचना खासदारांनी केली. याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी सदर काम लवकरात लवकर मार्गी लावून संबंधित जेट्टी वरून लवकरच बोट सुरु होणार असे सांगितले.
तसेच माननीय खासदार यांनी संबंधित सर्व प्रकल्पांना गती मिळावी व प्रकल्प पूर्णत्वास यावा यासाठी केंद्रीय मंत्री महोदयांनाकडे संबंधित अधिकारी व खासदारांची आपल्या स्तरावर बैठक आयोजित करावी अशी विनंती केली असता त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी लगेच मान्यता दिली.