
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन – २०२१अंर्तगत सानपाडा प्रभाग ७६ मध्ये सुशोभिकरण मोहीम राबविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक युवा नेतृत्व पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या वर्षी स्वच्छ भारत मिशन यामध्ये आपल्या नवी मुंबई शहराचा देशामध्ये तिसरा क्रमांक आला. यामध्ये पालिका अधिकारी व सफाई कामगार यांचे असलेले अतुलनीय योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. महापालिका शासनाकडून सध्या स्वच्छ भारत मिशन-२०२१ अभियानास सुरूवात झालेली आहे. देशामध्ये आपल्या नवी मुंबईचा प्रथम क्रमांक यावा यासाठी आपण सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्नांना सुरूवातही केलेली आहे. त्याबाबत पांडूरंग आमले यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाला शुभेच्छाही दिल्या.
या अभियानामध्ये प्रभाग ७६ चाही हातभार लागावा या प्रामाणिक हेतूने पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांना हे हे निवेदन सादर करत असल्याचे सांगून निवेदनात पुढे म्हणाले की, प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २, ३, ४, ८ चा समावेश होत आहे. प्रभागातील शाळा, मार्केट, चौक, उद्यान, सोसायटीच्या संरक्षक भिंत यांची रंगरंगोटी करण्यात यावे, सुशोभित भिंतीवर सुभाषित रंगवावीत, सुभाषितांमधून लोकप्रबोधन, जनजागृती व्हावी हाच एकमेव हेतू आहे. प्रभागातील रस्ते, गटारे, डेब्रिज हटविण्यात यावे, विद्युत डीपीची सफाई, पदपथाचीही रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. आपण स्वत: परिसराची पाहणी करावी. प्रभागाचे सुशोभीकरण व नागरी समस्यांचे निवारण झाल्यास प्रभाग ७६ मधून स्वच्छ भारत मिशनच्या मोहीमेलाही हातभार लागेल असे पांडूरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.