
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील नादुरूस्त व बंद पडलेल्या पथदिव्याची दुरूस्ती करणेबाबत व सातत्याने तक्रारी करूनही या समस्येचे निवारण होत नसल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या काही महिन्यापासून बंद आहेत, अनेक पथदिवे बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. या बंद पडलेल्या व नादुरूस्त असणाऱ्या पथदिव्यांबाबत पालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी तक्रारी केलेल्या आहेत. पालिका विभाग कार्यालयात अनेक हेलपाटे मारून, सतत फोन करून, भेटीगाठी घेवून संबंधितांच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही या समस्येचे निवारण होत नाही. या प्रभागातील अधिकाधिक रहीवाशी हे सिडको सदनिकाधारक आहेत. ते करदाते आहेत. करदात्या नवी मुंबईकरांना सांयकाळनंतर बंद पडलेल्या पथदिव्यामुळे अंधारातच ये-जजा करावी लागत आहे. आम्ही समस्या निवारणासाठी सतत पाठपुरावा करत असूनही पालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार समस्या सोडवित नसल्याने स्थानिक परिसरात आम्हाला लोकनाराजीचा सामना करावा लागत आहे. आपण स्वत: येवून प्रभागात पाहणी करून समस्येचे गांभीर्य जाणून घ्यावे. गेल्या काही महिन्यापासून प्रभागातील पथदिवे बंद ठेवणाऱ्या व दुरूस्ती न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. ठेकेदाराकडे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्याने रात्रीच्या वेळी प्रभागात फेरफटका मारल्यास बंद पडलेले व नादुरुस्त असलेले पथदिवे संबंधितांच्या निदर्शनास येईल. परंतु महापालिका प्रशासनाने व ठेकेदाराने पथदिव्याच्या सोयीबाबत आमचा परिसर वगळला असेल तर आम्हाला तसे लेखी द्यावे. आम्ही पाठपुरावा करूनही पथदिव्याची समस्या जाणिवपूर्वक प्रशासनाकडून व ठेकेदारांकडून समस्येचे निवारण होत नसेल तर यातून आम्ही व स्थानिक रहीवाशांनी काय बोध घ्यावा, याचे आपणच उत्तर द्यावे. सध्या महिला वर्गाबाबत अनेक चित्रविचित्र घटना घडत आहे. बंद पथदिव्यामुळे परिसरात अंधाराचा गैरफायदा उचलत कोणा समाजविघातक प्रवृत्तींकडून काही अनैतिक घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार जबाबदार राहील व त्या घटनेविषयी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडे पाठपुरावा करू. आपण समस्येचे गांभीर्य जाणून घेवून शक्य तितक्या लवकर समस्येचे निवारण करण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी गणेश भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.