
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोनाग्रस्त शिक्षिकेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या मुख्याध्यापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिक्षक सेनेकडून करण्यात येत आहे. कोरोना काळात ऑनड्यूटी सेवा बजविणाऱ्या शिक्षिकेचा कोरोना आजारानेच मृत्य झाल्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षक वर्गात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिक्षक सेनेकडून करण्यात आल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी, ६ ऑक्टोबर २०२० रोजी शिव समर्थ विद्यालय ठाणे येथे कार्यरत असलेल्या उपशिक्षिका सौ. अलका अनिल सूर्यवंशी यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. याबद्दल अधिक माहिती घेता असे कळाले की, सदर शिक्षिका कोरोना काळात कोविंड ड्युटीवर कार्यरत होत्या, त्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. प्रकृतीत सुधारणा होतच होती, तोच लगेचच ४ ऑगस्ट २०२० पासून शाळेत सक्तीने येण्याची मागणी मुख्याध्यापकांकडून होऊ लागली व शाळेत न आल्यास पगार कपात व रजा लावण्याची धमकीवजा सूचना देण्यात आली. आपल्यावर कारवाई होईल आपली रजा लागेल या भीतीने त्या शाळेत जाऊ लागल्या व पुन्हा तेथे कोरोनाची लागण झाली.
रिझल्ट लावणे, नवीन कॅटलॉग करणे यासारखी कारणे देऊन शिक्षकांना शाळेत बोलवण्यात येऊ लागले. मात्र याची माहिती घेता सूत्रांकडून कळाले की, शाळेचा रिझल्ट हा ४ मे रोजी सर्व शिक्षकांनी शाळेत येऊन पूर्ण केलेला होता . त्यामुळे रिझल्ट पुन्हा बनवण्याचा प्रश्नच उरत नाही. सरकारने शाळा सुरू करण्याचे काही आदेश दिले नाही, तेव्हा नवीन कॅटलॉग तयार करण्याची घाई करण्याची गरज नव्हती.
वास्तविक सरकारने २४ जून २०२० रोजी परिपत्रक काढून दहा टक्के उपस्थिती बाबत सूचना केली होती . त्यात महिला कर्मचारी दुर्धर आजाराने ग्रस्त कर्मचारी व ५५ वर्षांपेक्षा वरील कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होम द्यावे, शाळेत बोलवण्याची गरज नाही असे नमूद केले होते. या सर्व शासकीय नियमांची पायमल्ली करून स्वतःची मनमानी करून शाळेत येण्याची सक्ती करण्यात आली. लॉक डाऊन मुळे गावी अडकलेल्या शिक्षकांना प्रवासाचे कोणतेही साधन नव्हते अशा शिक्षकांनी हजारो रुपये खर्च करून खाजगी वाहनाने जीव धोक्यात टाकून प्रवास केला. ज्यांना शक्य झाले नाही अशा शिक्षकांच्या रजा लावण्यात आल्या व शिक्षकांना CLच्या ऐवजी EL चा अर्ज देण्यास सांगितला. शाळेत येणारे शिक्षक हे डोंबिवली,अंबरनाथ,बदलापूर,पनवेल, गोरेगाव अशा ठिकाणा वरुण येतात. लॉक डाऊन च्या काळात शाळेत येताना अशा शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही त्या आदेशांना डावलून मुख्याध्यापकांनी आपल्या हेकेखोर वृत्तीमुळे सर्व शिक्षकांचा जीव टांगणीला लावला व जे व्हायला नको होते ते झाले. शाळेतील महिला शिक्षिका यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या सर्व घटनेला शाळेचे मुख्याध्यापक सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे अशा मुख्याध्यापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व कारवाई करावी अशी मागणी शिक्षक सेनेकडून करण्यात येत आहे.