
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन – २०२१ अंर्तगत नवी मुंबई शहरामध्ये सुशोभीकरण मोहीम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
गेल्या वर्षी स्वच्छ भारत मिशन यामध्ये आपल्या नवी मुंबई शहराचा देशामध्ये तिसरा क्रमांक आला. यामध्ये पालिका अधिकारी व सफाई कामगार यांचे असलेले अतुलनीय योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. महापालिका शासनाकडून सध्या स्वच्छ भारत मिशन-२०२१ अभियानास सुरूवात झालेली आहे. देशामध्ये आपल्या नवी मुंबईचा प्रथम क्रमांक यावा यासाठी आपण सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्नांना सुरूवातही केलेली असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच महापालिका प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
या अभियानामध्ये नवी मुंबई शहरात येणाऱ्या सर्व पालिका प्रभागांचा हातभार लागावा या प्रामाणिक हेतूने आपणास हे निवेदन सादर करत आहे. नवी मुंबई शहरात नोडमध्ये येणाऱ्या सर्व प्रभागातील शाळा, कॉलेज, समाजमंदिर, मार्केट, चौक, उद्यान, सोसायटीच्या संरक्षक भिंत यांची रंगरंगोटी करण्यात यावे, सुशोभित भिंतीवर सुभाषित रंगवावीत, सुभाषितांमधून लोकप्रबोधन, जनजागृती व्हावी हाच एकमेव हेतू आहे. प्रभागाप्रभागातील रस्ते, गटारे, डेब्रिज हटविण्यात यावे, विद्युत डीपीची सफाई, पदपथाचीही रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. महापालिका आयुक्तांनी प्रभागाप्रभागात जावून स्वत: परिसराची पाहणी करावी. नवी मुंबई शहरात येणाऱ्या सर्व प्रभागाचे सुशोभीकरण व नागरी समस्यांचे निवारण झाल्यास स्वच्छ भारत मिशनच्या मोहीमेलाही हातभार लागेल असे अशोक गावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोरोना आजारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे रूग्णालयात उपचार घेत असताना नवी मुंवईतील विविध प्रश्नांबाबत, तसेच नवी मुंबईकरांच्या समस्यांबाबत निवेदनातून (मेल) सतत पाठपुरावा करत असल्याने महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा बळकट होत असलेला जनसामान्यातील नारा महाविकास आघाडीला सत्तासंपादनात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे हळूहळू स्पष्ट होवू लागले आहे.