
नवी मुंबई : महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लवकरात लवकर देण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईतील शालेय, महाविद्यालयीन तसेच इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून नियमितपणे देण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून शिष्यवृत्ती वितरणाला विलंब होत आहे. त्यातच आता कोरोना या जागतिक महामारीचे संकट निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना पालिका प्रशासनाकडून शिष्यवृत्ती वितरणास विलंब झाला आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असून फी भरण्यासाठी शालेय व्यवस्थापणाकडून तगादा लावला जात आहे. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर शिष्यवृत्ती दिल्यास त्यांना तेवढाच आर्थिक हातभार लागेल. पालकवर्गाकडे शाळांनी लावलेला तगादा पाहता शिष्यवृत्ती वितरीत करण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश देण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.