
· महापालिका वेठीस धरत असल्याचा मनसेने केला थेट आरोप
नवी मुंबई : कोरोना कालावधी मध्ये सुद्धा सर्व -सामान्य नागरिकांना विविध नागरी समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा थेट आरोप मनसेने मंगळवारी उपायुक्त अतिक्रमण तथा परीमंडळ २ अमरीश पटनिगिरे यांच्याकडे केला. सदरच्या प्रश्नांसंबंधी येत्या १५ दिवसांत महापालिकेने गांभीर्याने कारवाई न केल्यास खळ-खट्याक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
· १५ दिवसात अनधिकृत बांधकामे हटवा
नवी मुंबई शहर सचिव रुपेश कदम यांनी ऐरोलीमध्ये सुरु असलेल्या बेछूट अनधिकृत बांधकामाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत लॉक डावूनचा कालावधी अनधिकृत माफियांसाठीच होता की काय अशी शंका उपस्थित केली . ऐरोली मध्ये अतिक्रमण विभागात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढत येत्या १५ दिवसांत महापालिकेने संबंधित अनधिकृत बांधकामे निष्कासित करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी मनसे शहर सचिव रुपेश कदम यांनी केली.
· समस्यांचा वाचला पाढा
घणसोली गावांमधील समस्यांचा तर पाढाच यावेळी विभाग अध्यक्ष रोहन पाटील यांनी उपायुक्तांपुढे वाचला. तळवली गावांमधील रस्ते व फूटपाथची झालेली दुरवस्था असो वा बंद अवस्थेतील पथदिवे, घणसोली गावांमधील स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाच्या फलकाची दुरवस्था असो संबंधित विभागाला वारंवार मनसेने निवेदन दिल्याचे पुरावे मनसे शिष्टमंडळाने यावेळी सादर केले. त्याचबरोबर घणसोली गावांमधील तुटलेली गटारे, अस्वच्छ शौचालये व रस्त्यावर भरभरून वाहणाऱ्या कचरा कुंड्या यांचे फोटो व विभाग अधिकाऱ्यांना दिलेली निवेदने मनसेचे शेखर गावडे व प्रणय धरपाळ यांनी दाखवून आपला संताप व्यक्त केला.
· अमृत योजनेचा उडाला फज्जा
घणसोली कॉलनी मधील मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण यांनी गेल्या सहा महिन्यांत घणसोली महापालिका विभाग कार्यालयात चार ते पाच विभाग अधिकारी यांची बदली झाल्याने एकंदरीतच घणसोली मधील नागरिकांच्या प्रश्नांना महापालिकेमधील वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने घेत आहेत का, अशी सर्व सामान्य जनतेच्या मनातली चीड व्यक्त केली. तसेच उपविभाग अध्यक्ष श्याम वाघमारे यांनी घणसोलीमधील अमृत योजनेचा उडालेला फज्जा व सेक्टर ४ येथे रस्त्यावर सर्वदूर पसरणारा कचरा, उद्यानांची झालेली दुरवस्था महापालिका उपायुक्तांच्या लक्षात आणून दिली.
· ठराविक भागातच वारंवार कारवाई
कोपरखैरणे मनसेचे सह- सचिव शरद डिगे व पावणे गांवमधील मनसेचे शाखा अध्यक्ष महेश साठे यांनी कोपरखैरणे एम. आय.डी.सी. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था व पावणे गांव अंतर्गत समस्यांची विस्तृत माहिती दिली. तसेच समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याची मागणी केली. वाशी विभागातील अतिक्रमण विभागाच्या समस्यांबाबत मनसेचे सह-सचिव अमोल इंगवले, अभिलेष दंडवते, अशोक भोसले यांनी अतिक्रमण उपायुक्तांना सांगितले की, कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सर्व सामान्य जनता व व्यापारी तसेच फेरीवालेसुद्धा त्रासलेले असताना वाशी विभागात काही ठराविक क्षेत्रात महापालिकेच्या तर्फे जाणीवपूर्वक वारंवार कारवाई केली जात आहे, जे फेरीवाले वाशी विभागात गेली ८ ते १० वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे, परंतु जे नवी मुंबई शहराच्या बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांना मात्र मोकाट सोडले जात आहे, एका बाजूला किरकोळ व्यवसायिक ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना शासनाच्या योजनेमधून पुन्हा आपला व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली जात आहे तर, दुसऱ्या बाजूला वाशी विभाग अतिक्रमण विभागातील अधिकारी मात्र हेतुपुरस्सर कारवाई करत असल्याचे मत यावेळी अमोल इंगवले, अभिलेश दंडवते व अशोक भोसले यांनी व्यक्त केले.
मनसेच्या शिष्टमंडळात मनसेचे नवी मुंबई शहर सचिव रुपेश कदम, सह-सचिव अमोल इंगवले, शरद डीगे व संदीप गलुगडे, अभिलेश दंडवते, रोहन पाटील, विशाल चव्हाण, अशोक भोसले, किरण काकेकर, श्याम वाघमारे, महेश साठे, शेखर गावडे, प्रणय धरपाळ, अतुल जाधव, अरुण पाटील, रुपेश पवार, धीरज शिंदे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.