
स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
- लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क नाही तर फक्त फक्त रुपये १००० घेणार
- हप्ते न भरल्यामुळे सदनिका रद्द केलेल्या १७०० सदनिका धारकांनाही दिलासा मिळणार.
- सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांचे मनसे शिष्टमंडळाला आश्वासन
नवी मुंबई : सिडकोने २०१८-२०१९ मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि आणि अत्यल्प उत्पन्न गटातील १४५०० घरांसाठी काढलेल्या सोडत धारकांना लाखो रुपये मुद्रांक शुल्क आकारले जात होते. कोरोना काळात विविध समस्यांमुळे पीडित सोडत धारकांना हा भुर्दंड अन्यायकारी होता. त्याचप्रमाणे जवळपास १७०० सोडत धारकांनी आर्थिक अडचणींमुळे हप्ते न भरल्यामुळे त्यांची सोडत रद्द करण्यात आली होती. मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची या आणि इतर मुद्द्यांसंदर्भात भेट घेतली. तेव्हा डॉ. मुखर्जी यांनी मुद्रांक शुल्क पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी शासन निर्णयाप्रमाणे रुपये १००० होईल, तसेच सदनिका रद्द केलेल्या १७०० सोडत धारकांनी हप्ते भरण्याची तयारी दाखवली तर त्यांना पुन्हा संधी देण्यात येईल, अशी दोन महत्वाचे आश्वासने डॉ. मुखर्जी यांनी मनसे शिष्टमंडळाला आणि सिडको सोडत धारकांच्या शिष्टमंडळाला दिले.
त्याचप्रमाणे खालील मुद्द्यांवरही सह व्यवस्थापकीय संचालक आणि पणन विभागाशी चर्चा करून खालील मुद्द्यांवरही सकारात्मक उत्तर देऊ, असे आश्वासन दिले.
- सिडकोने हप्त्यावरील विलंब शुल्क २४ मार्च २०२० ते २८ डिसेंबर २०२० माफ केले आहे .ज्या विजेत्यांनी हे विलंब शुल्क भरले आहे, त्यांचे शुल्क इतर शुल्क (Other Charges) मध्ये वजा करण्यात यावे.
- त्याचप्रमाणे १ ते ४ हप्ते भरण्यासाठी विलंब झाला असेल, तर विलंब शुल्क २३ मार्च पर्यंत आकारण्यात यावे. हप्ते उशिरा भरलेल्या सोडत धारकांना विलंब शुल्क १२% ते १८% जादा आकारण्यात येते. गरिबांसाठी हे शुल्क जास्त असून, हा दर कमी करण्यात यावा. कोरोना संकटकाळात घरभाडे व बॅक हप्ते भरुन सिडको सोडत धारक अडचणीत सापडलेले आहेत, त्यामुळे घराचा ताबा लवकर भेटावा. जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल. वाटप(Allotment) पत्रामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या सबसिडीचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेले सहअर्जदार (Co Applicant) चे नाव जोडण्यासाठी सिडको आकारत असलेले ५०००/- + जीएसटी शुल्क म्हाडा प्रमाणे माफ करण्यात यावे.
सिडको लवकरच या संदर्भातील लेखी आश्वासन देईल असेही डॉ. मुखर्जी यांनी सांगितले. मनसेच्या या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, सह सचिव अभिजित देसाई, पालिका कामगार सेना शहरअध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, शाररिक सेना शहर संघटक सागर नाईकरे, विभाग अध्यक्ष अमोल आयवले, विनोद पाखरे, विद्यार्थी सेना उप शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, संनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर उपाध्यक्ष अनिकेत पाटील, मंगेश काळेबाग उपस्थित होते.