
श्रीकांत पिंगळे : ९८२००९६५७३
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना डावलून उद्यान विभागाचे कंत्राट स्थानिक नसलेल्या मुंबईतील एका बड्या ठेकेदारास दिल्याची घटना ताजी असताना स्वच्छता साफसफाईचे कामही स्थानिक असलेल्या ९६ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना अंधारात ठेऊन अशाच पद्धतीने करण्याचा डाव नवी मुंबई महापालिका प्रशासन आखत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अन्यायाबाबत कंत्राटदारांनी बेलापुरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेतली.
बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार म्हात्रे यांनी आक्षेप घेत सदरची कामे ही स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना प्रथम प्राधान्याने देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याच अनुषंगाने नवी मुंबईतील सर्व प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांना पुढील कंत्राटे मिळण्याबाबतच्या कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली असून महापालिका उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते. तसेच सदरबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर व अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांजबरोबर आमदार मंदाताई म्हात्रे या फोनवर सतत संपर्कात होत्या.
मुख्य म्हणजे गेली २३ वर्ष हे कंत्राटदार पालिकेची कामे करत आहेत. याच कंत्राटदार, कर्मचाऱ्यांमुळे नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेत पारितोषिके मिळाली असताना त्यांना डावलून कंत्राटे इतरांना देण्यात येत आहेत. याविषयी आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून कंत्राटे प्रकल्पग्रस्तांनाच मिळाली पाहिजेत यासाठी त्यांचा पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. सोमवारी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांसमवेत आयुक्त अभिजित बांगर यांची भेट देखील आमदार मंदाताई म्हात्रे घेणार आहेत.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त गेली २३ वर्षे महापालिकेची स्वच्छता तसेच उद्यान विभागाची कामे कोणतीही निविदा दर न वाढविता जबाबदारीने व इमानदारीने करीत आहेत. आज स्वच्छतेच्या स्पर्धेत नवी मुंबईचा संपूर्ण भारतात तिसरा व महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला आहे, ही त्यांच्या कामांचीच पोचपावती आहे. त्यांनी स्वतःचे घर समजून गेली २३ वर्षे सेवा केली आहे, असे असतानाही महापालिका प्रशासन स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून महापालिकांची कामे बाहेरील कंत्राटदाराला देऊन त्यांच्यावर अन्याय करीत आहे. त्यांना देशोधडीला लावण्याचे काम महापालिकेकडून होत आहे. प्रकल्पग्रस्तांचा विषय हा नेहमीच माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याने माझ्या प्रकल्पग्रस्त बांधवांना कामे मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बोलताना व्यक्त केला.