
नवी मुंबई : दिपावलीच्या पार्श्वभूमीवर पालिका आस्थापनेवरील कायम कर्मचारी-अधिकारी, ठोक मानधनावरील, कंत्राटी तसेच अन्य कामगारांना गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट बोनस देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणना होत आहे. या महानगरपालिकेच्या अडीच हजार कोटीच्या ठेवी आहेत. मोरबेसारखे स्वमालकीचे धरण आहे. त्यातच या महापालिकेला राज्य व केंद्र सरकारकडून सतत पारितोषिकांचा वर्षाव होत आहे. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात महापालिकेला राज्यात सलग दोन वर्षे प्रथम क्रमाकांचे पारितोषिकही मिळालेले आहे. याशिवाय नुकतेच स्वच्छ भारत मिशन या अभियानात केंद्र सरकारकडून देशामध्ये तिसऱ्या क्रमांक व राज्यामध्ये प्रथम क्रमांक नवी मुंबई महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. कोरोना काळात राज्यात, देशातच नाहीतर जगभरातील अन्य प्रशासन हतबल झालेले असताना नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोरोनाशी लढा देताना सर्वोत्तम कामगिरी बजावली असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाचा उद्रेक होवू न देता परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे. याशिवाय कोरोना काळात पालिका प्रशासनाच्या आर्थिक डौलाराही कुठे पडणार नाही याची काळजी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. तसेच एकीकडे कोरोनाशी आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी वर्ग रूग्णालयात निकराचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे सफाई कचरा, कचरा वाहतुक कामगार, शिक्षक, पालिका प्रशासनातील आस्थापनेतील कायम सेवेतील कर्मचारी-अधिकारी, ठोक मानधनावरील कामगार, कंत्राटी कामगार या सर्वांनीच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून नागरी समस्या सोडविण्याचे व नागरी सुविधा पुरविण्याचे काम चोख बजावले आहे. कोरोना काळात त्यांनी मार्चपासून बजावलेल्या सेवेचाही कोठेतरी बोनसच्या माध्यमातून सन्मान होणे आवश्क आहे. त्यातून त्यांना कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल. शिवाय महापालिका प्रशासनाकडून आपण करत असलेल्या कामाची बोनसच्या माध्यमातून दखल घेत असल्याचा संदेशही कर्मचारी व अधिकारी वर्गात जाईल.
गतवर्षी महापालिका प्रशासनाने कायम आस्थापनेवरील कर्मचारी- अधिकाऱ्यांना २५ हजार रूपये, परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना १७ हजार रूपये, पालिकेच्या कंत्राटी कामगारांना १९ हजार रूपये, आशा लिंक कामगारांना ९ हजार रूपये बोनस मिळाला होता. यावर्षी महापालिका प्रशासनाने संबंधित सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांना गतर्षीच्या तुलनेत दुप्पट बोनस देणे आवश्यक आहे. आपण कोरोना काळात सर्वानीच बजावलेली चोख कामगिरी, स्वच्छ भारत अभियानात देशामध्ये आपल्या शहराचा आलेला तिसरा क्रमांक व राज्यात प्रथम क्रमांक याचा विचार करून लवकरात लवकर पालिका प्रशासनाने सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांना गतवर्षीच्या तुलनेत दु्प्पट बोनस जाहिर करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे.