
सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शहरातील कोरोना व पालिका प्रशासन त्यावर करत असलेल्या उपाययोजना तसेच शहरातील अन्य प्रमुख विषयांबाबत ऐरोलीतील भाजपा आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे काही कोव्हीड सेंटरमध्ये तात्पुरते प्रवेश थांबवले असल्याची बाब समोर आली आहे. परंतु सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे तरी किमान अजून एक महिना शहरातील रुग्णांच्या संख्येचा लेखाजोखा घेऊन कोव्हीड सेंटर कमी करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, नवी मुंबई शहरात पहिल्या टप्प्यात किती लोकांना कोरोनाची लस द्यावी लागेल याबाबत योग्य ती माहिती संकलित करून शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा करणाऱ्यांना सुरुवातीला लस देण्यात यावी. पुढील वर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या अर्थाने आणि दहावीच्या परीक्षेतील यशापयशाबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढला आहे तरी नवी मुंबई महानगरपालिकाला किती निधी प्राप्त झाला आहे याबाबत सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. तसेच गेल्या सात महिन्यांपासून आपले कर्तव्य पार पाडणार्या महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त लवकरच दिवाळी बोनस देण्यात यावे. विभागातील विविध उद्यानांची योग्य प्रकारे देखभाल राखण्याबाबत संबंधितांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
अशा विविध विषयांबाबत आयुक्तांशी आमदार गणेश नाईक यांनी केली, तसेच आयुक्तांना निवेदनही सादर केले.
यावेळी आमदार गणेश नाईक यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नांना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी उत्तरे देताना पालिका प्रशासन राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी आमदार गणेश नाईक यांच्यासमवेत शिष्टमंडळात ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, जयवंत सुतार, सागर नाईक, माजी नगरसेवक सुरज पाटील, दशरथ भगत, जयाजी नाथ, नवीन गवते, जब्बार खान, माजी नगरसेविका माधुरी सुतार, नेत्रा शिर्के यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका व भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते.