
नवी मुंबई : सानपाडा, प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याची मागणी स्थानिक भाजप नेते पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळा पूर्णपणे संपला आहे. परतीच्या पावसाचाही कारभार आता पूर्णपणे आटोपला आहे. प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३, ४, ८ या परिसराचा समावेश होत आहे. या प्रभागात अधिकांशपणे सिडको गृहनिर्माण सोसायट्यांचा व काही प्रमाणात खासगी सोसायट्यांचा समावेश होत आहे. येथील सदनिकाधारक अल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचे निवासी वास्तव्य आहे. सध्या सानपाडा नोडमध्ये डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. पावसाळ्यात महापालिका धुरीकरण करत नसल्याने आता साथीच्या आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण मोहीम राबविणे आवश्यक आहे. प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.