
कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या महापालिका ते मंत्रालयीन पाठपुराव्याला येणार यश
नवी मुंबई : महापालिका प्रशासनामध्ये ठोक मानधनावर काम करणाऱ्या ४५ संवर्गातील सुमारे ५४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा कायम व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने मंत्रालयीन पातळीवर प्रस्ताव पाठविल्याने या कामगारांना ‘इंटक’च्या पाठपुराव्यामुळे खऱ्या अर्थाने कायम सेवेची भेट मिळून त्यांच्या आयुष्यात दिवाळी साजरी होणार आहे.
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या या सर्वच ठोक मानधनावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांची सेवा कायम व्हावी यासाठी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासन व मंत्रालयीन पातळीवर प्रत्यक्ष भेटीगाठी घेवून आणि लेखी निवेदनाचा रतीब टाकून या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे व मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. मागील आयुक्त अण्णासाहेब मिसाळ तसेच विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांच्या सतत भेटीगाठी घेत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी संबंधित कामगारांच्या कायम सेवेचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवावा यासाठी सतत साकडे घातले. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त अभिजित बांगर व मागील आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना प्रत्यक्ष फोन करून लवकरात लवकर महापालिका प्रशासनाकडून ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेबाबतचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पर्यायाने सरकारकडे पाठविण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांनी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्याची दखल घेताना विधान भवनात स्वत:च्या दालनात स्वत:च्याच उपस्थितीत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, अन्य पालिका अधिकारी तसेच नगरविकास खात्याचे अधिकारी आणि कामगार नेते रवींद्र सावंत तसेच नवी मुंबई इंटकचे पदाधिकारी यांची बैठक घडवून आणली व नाना पटोळे यांनी याच बैठकीत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा प्रस्ताव लवकरात लवकर राज्य सरकारकडे पाठविण्याचे निर्देश दिले. कामगार नेते रवींद्र सावंत यांनी याप्रकरणी अधिवेशनादरम्यान विधानभवनात प्रस्ताव मांडून चर्चाही घडवून आणताना राज्य सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधले होते.
राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम व्हावी यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवून त्यास मंजुरी घेवून त्या कामगारांची सेवा कायम झालेली आहे. त्या महापालिकांमध्ये ठोक मानधनावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांची सेवा कायम होवू शकते, मग त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचारी-अधिकाऱ्यांची सेवा कायम करावी यासाठी महापालिका प्रशासन व मंत्रालयाकडे पाठपुरावा करताना संबंधित महापालिका प्रशासनाचे ठरावही नवी मुंबई महापालिका प्रशासन व मंत्रालयीन पातळीवर कामगार नेते रवींद्र सावंत यांनी निदर्शनास आणून दिले होते. राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर सहकार्य केले असल्याची माहिती कामगार नेते रवींद्र सावंत यांनी दिली.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी २२ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात नगर विकास विभागातील प्रधान सचिवांकडे ठोक मानधनावर कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच कामगार नेते रवींद्र सावंत यांच्यामुळे ठोक मानधनावरील सर्वच कर्मचारी अधिकाऱ्यांची सेवा कायम होवून त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करता येणार आहे.