
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ४२ मधील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात धुरीकरण करून देण्याची मागणी समाजसेविका व भाजपा कार्यकर्त्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर २२,२३, १६,१७ या परिसराचा समावेश होत आहे. प्रभाग ४२च्या मागील बाजूस खाडी असल्याने येथील रहीवाशांना बाराही महिने डासांचा व साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळा पूर्णपणे संपला असून परतीचा पाऊसही येवून गेला आहे. पावसाळ्यात पालिका प्रशासन धुरीकरण करत नाही. आता पावसाळा नसल्याने प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर २२,२३, १६,१७ या ठिकाणच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आतील भाग, रो-हाऊसच्या सोसायट्या व एलआयजीच्या धर्तीवरील बैठे कंपाऊड यातील आतील भागात लवकरात लवकर परंतु नियमितपणे धुरीकरण करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, जेणेकरून डासांचा त्रास व साथीचे आजार आटोक्यात येण्यास मदत होईल. प्रभागालगतच असलेला खाडीकिनारा यामुळे डासांच्या उद्रेकाचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल. त्यामुळे आपण संबंधितांना तसे निर्देश द्यावेत अशी मागणी सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.