
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने अखेर नेरुळमध्ये साकारणार सायन्स सेंटर
श्रीकांत पिंगळे : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने अखेर नेरूळ से-१९ येथील वंडर्स पार्क क्षेत्रात सायन्स सेंटर उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत त्याकरिता ७० कोटी रूपये कोटी मंजूर करण्यात आले असून लवकरच सदर सायन्स सेंटर उभारण्याचे काम सुरु होणार असल्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सूचित केले आहे. सायन्स सेंटर उभारल्याने नवी मुंबईच्या विकासात भर पडणार असून नवी मुंबईतील नागरिकांना त्याचा आनंद लुटता येणार आहे. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या दूरदृष्टीतून नवी मुंबईत प्रामुख्याने बेलापूर मतदारसंघात सायन्स सेंटर साकारण्यात यावे, अशी मागणी तत्कालीन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांजकडे २०१५ साली करण्यात आली होती. तसेच आयुक्त, तत्कालीन शहर अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांसह सायन्स सेंटर उभारण्यात येणाऱ्या ठिकाणी दौराही केला होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सदर विषयाच्या अनुषंगाने भेट घेतली होती. आपल्या विशेष प्रयत्नाने बेलापूर विधानसभा क्षेत्रात सायन्स सेंटरची उभारणी होणार असल्याने प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे मत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले.
नेरूळ से-१९ येथील वंडर्स पार्क मधील क्षेत्रात सुमारे ३५ हजार चौ.मी. जागेत सदरचे सायन्स सेंटर उभारण्यात येणार असून सायन्स सेंटरचा पहिला टप्पा २० हजार चौ.मी. वर विकसित केला जाणार आहे. त्याकरिता ७० कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून नवी मुंबईचे विद्यार्थी आणि रहिवासीच नव्हे तर राज्य व देशातील पर्यटकांचेही हे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचेही आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.