
नवी मुंबई : महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तयार केल्यानंतर ‘शिवसेनेे’ने नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या पुर्नविकासाची ब्ल्यु प्रिंट तयार केली आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या सुमारे 50 हजार कुटुंबाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दिघा पासून ते ऐरोलीपर्यंतच्या झोपडपट्ट्यांच्या विकासाचे आराखडे तयार करण्यात आले असून ते लवकरच सरकारला सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दिली.
नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास तातडीने व्हावा, यासाठी ‘शिवसेने’च्या माध्यमातून होत असलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये 2 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विजय चौगुले बोलत
होते.
नवी मुंबई शहरातील दिघापासून ते ऐरोलीपर्यंतच्या झोपडपट्ट्यांच्या पुर्नविकासासाठी ‘शिवसेने’च्या माध्यमातून आराखडे तयार करण्यात आले आहेत. एसआरएच्या माध्यमातून या भागात गोरगरींबासाठी 27 माळ्यांचे टॉवर्स उभे केले जाऊ शकतात.गोरगरीबांना याच वास्तुत राहता यावे यासाठी कमीत कमी देखभाल खर्चाचीही तरतूद करण्यात येणार आहे. या विकासात राजकारण न आणता सर्वांनी एकत्र यावे. अर्थकारणामुळे नवी मुंबईतील झोपडपट्यांचा विकास रखडला आहे. मात्र, ‘महाविकास आघाडी सरकार’ने आता या गोरगरीबांच्या पुर्नविकासासाठी स्वतंत्र पुनर्वसन प्राधिकरण तयार केल्यामुळे झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळणार आहे, असेही चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुनर्विकास प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईकांनाही घालणार गळ
गोरगरीब झोपडपट्टीवासियांच्या हक्काच्या घराच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर मलाच काय इतरांचादेखील कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. पण, ‘शिवसेना’ला नवी मुंबईतील या गोरगरीब जनतेला न्याय द्यायचा आहे. त्यासाठी शासनस्तरावर पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांनी व्यक्तीश: लक्ष घातलेले आहे. त्यामुळे ‘ऐरोली’चे स्थानिक आमदार गणेश नाईक यांचा देखील यामध्ये सहभाग असावा, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी मी स्वत: आणि जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर आमदार गणेश नाईक यांना व्यक्तीश: भेटून त्यांना
विकासाची ब्ल्यु प्रिंट दाखविणार आहोत, असे विजय चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच गणेश नाईक यांचे समाजकारण-राजकारण मी जवळून बघितलेले आहे. फक्त त्यांच्या बाजुला अर्धवट डोक्याची माणसे बसली असून या लोकांपासून त्यांनी सांभाळून रहावे, असा टोलाही विजय चौगुले यांनी यावेळी लगावला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख
मनोज हळदणकर, राजू पाटील, ॲड. रेवेंद्र पाटील, जगदीश गवते, अभंगराव शिंदे आदि उपस्थित होते.