
स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबई शहरातील अपंगांना दिली जाणारी पेन्शन तीन महिने विलंबाने दिली जात असल्याने ती वेळेवर देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबई शहरातील अपंग व्यक्तिंना पेन्शनच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येत आहे. ० ते १८ वर्षे वयोगटासाठी १८ हजार रूपये, १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी २४ हजार रूपये, ४५ वर्षे वयोगटाच्या पुढे ३० हजार रूपये वार्षिक आर्थिक मदत गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. वाढत्या महागाईच्या काळात ही अपंगांना दिली जाणारी मदत तशी तुटपुंजीच आहे. खेदाची बाब म्हणजे महापालिका प्रशासनाकडून दिली जाणारी ही मदत तीन महिन्यानंतर प्राप्त होते. तीन महिने विलंब न होता ही आर्थिक रक्कम त्वरीत मिळणे आवश्यक आहे. या विलंबाबाबत आपण प्रशासकीय स्तरावर चौकशी करून नवी मुंबईतील अपंग व्यक्तिंना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.