
सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थे संबंधीचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी मनसे आग्रही
- अन्यथा आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा
स्वयंम न्यूज ब्युरो: ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिका आयुक्तांची भेट घेऊन घणसोली मधील सेक्टर ९ , भूखंड क्रमांक ३ , या ठिकाणी रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर रुग्णालयच उभारावे अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली.
घणसोली सेक्टर ९ येथे घरोंदा वसाहत ही सिडकोने २००४ साली गृहप्रकल्प उभारून नागरिकांना घरे दिली आहेत , त्यावेळी सिडकोने नागरिकांच्या सोयी साठी उद्यान , शाळा , रुग्णालय असे भूखंड आरक्षित ठेवले होते .१४ डिसेंबर २०१६ ला घणसोली नोड सिडकोने महापालिकेस हस्तांतरण केला व सदरच्या रुग्णालयासाठी आरक्षित असणाऱ्या १००० चौ.मीटर भूखंडावर महापालिकेमार्फत काही महिन्यांपूर्वी औषधे भंडार बनविण्याचे काम सुरू झाले , त्या कामास घणसोली मधील स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे , असे म्हणणे स्थनिक रहिवाशांना सोबत घेऊन मनसेच्या संदीप गलुगडे यांनी आयुक्तांसमोर मांडले.
एका बाजूला कोविड सारख्या जागतिक महामारीचा सामना करताना आपण करोडो रुपयांचा निधी कोविड सेंटर उभारण्यात खर्च केला. आता काही ठिकाणी रुग्ण संख्या कमी झाल्याने कोविड सेंटर बंद ठेवावे लागत आहेत , ही आनंदाची बाब असली तरी कायम स्वरूपी आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी रुग्णालयाच्या भूखंडावर रुग्णालयच उभारणे ही आता काळाची गरज असल्याचे मत संदीप गलुगडे यांनी आयुक्तांपुढे मांडले.
आज अंदाजे ५ ते ६ लाख लोकवस्ती असलेला घणसोली परिसर व सद्य:स्थिती मध्ये सुरू असणारे नवीन बांधकामे व सिडकोचा नवीन गृहप्रकल्प याने दिवसेंदिवस घणसोलीच्या लोकसंख्येत भरच पडणार आहे. औषध भंडार हे जरी आवश्यक असले तर महापालिकेने सद्य:स्थितीमध्ये बांधकाम थांबवून नवीन आराखडा बनवून त्याठिकाणी किमान चार मजल्याचे रुग्णालय व वरील दोन मजल्यावर औषध भांडार बनवण्याचे प्रस्तावित करावे , अन्यथा मनसे येत्या दिवसांत सदर जणप्रश्न सोडवण्याकरिता तीव्र आंदोलन छेडेल अशी माहिती यावेळी मनसेने निवेदनाद्वारे दिली.
सदर प्रसंगी घणसोली जेष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या वतीने जेष्ठ नागरीकांना विरंगुळा केंद्र बनवण्यासाठीच्या मागणीचे निवेदन ही देण्यात आले. यावेळी मनसेचे संदीप गलुगडे , विशाल चव्हाण , श्याम वाघमारे , प्रणय धरपाळ , देवानंद खिल्लारी , जेष्ठ नागरिक सेवा संघ घणसोलीचे दत्तात्रय कुंभार , प्रमोद गायकवाड , प्रभाकर देशमुख , रघुनाथ काते , उत्तम बनसोडे ,भास्कर आव्हाड , राजाराम देशमुख, अर्जुन घुले उपस्थित होते.