
स्वयंम न्यूज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ मधील डॉमेनिझ पिझ्झा ते नेरूळ २४ मधील वजरानी स्पोर्टस कॉम्पलेक्स (पामबीच सिग्नल टू सिनग्नल समांतर रस्ता) दरम्यानच्या अंर्तगत गटाराची व गटारावर बांधण्यात येणाऱ्या जॉगिंग ट्रॅकच्या कामाची चौकशी करून झाडांची छाटणी अथवा हानी होणार नाही याची तात्काळ पाहणी करण्याची मागणी महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी तात्काळ या निवेदनाची दखल घेत याप्रकरणी संबंधितांकडे हे निवेदन ‘फॉरवर्ड’ केले आहे. मनोज मेहेर यांच्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमींमध्ये जनजागृती झाल्याने या कामाविरोधात पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर ६ मधील डॉमेनिझ पिझ्झा ते नेरूळ २४ मधील वजरानी स्पोर्टस कॉम्पलेक्स (पामबीच सिग्नल टू सिनग्नल समांतर रस्ता) दरम्यान अंतर्गत गटारे व त्यावर जॉगिंग ट्रॅकचे काम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. मुळातच हे गटार झाडाच्या अंर्तगत भागात बांधले जात असून या गटाराच्यादोन्ही बाजूला काही अंतर काम करून तेथे जॉगिंग ट्रॅकही त्याच गटारावर बांधला जाणार आहे. मुळातच या गटाराच्या कामाची व त्यावर जॉगिंग ट्रॅकच्या कामाची गरजच काय होती, नेरूळमधील स्थानिक रहीवाशांनी अशा प्रकारे कोणतीही लेखी मागणी पालिका प्रशासनाकडे केलेली नसताना केवळ राजकारण्यांच्या ‘समाधाना’साठी हे काम सुरु झालेले आहे, असा प्रश्न मनोज मेहेर यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाला विचारला आहे.
नेरूळमधील अधिकांश रहीवाशी सकाळी व सांयकाळी पामबीच मार्गालगतच असलेल्या नेरूळ सेक्टर २४ मधील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे चालावयास तसेच जॉगिंग करावयास जात असतात. प्रत्येक विभागाविभागातील क्रिडांगणात व उद्यानामध्ये जॉगिग ट्रॅकची पालिका प्रशासनाने निर्मिती केलेली आहे. पामबीच मार्गालगत समांतर असणाऱ्या अंर्तगत असणाऱ्या समांतर रस्त्यावरही सकाळी व सांयकाळी मोठ्या संख्येने चालताना व जॉगिंग करताना दिसून येतात. आता महापालिका प्रशासनाने पामबीच समांतर रस्त्यावर सुरू केलेल्या गटाराच्या कामाची पाहणी केल्यास ते गटार पूर्णपणे त्या परिसरातील झाडांमधून गेले असून पर्यावरणाचीही काही प्रमाणात हानी झालेली असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनासोबत जोडलेल्या छायाचित्रातून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
उद्या हे काम झाल्यावर त्या गटाराकडील दोन्ही बाजूची काही जागा सामावून घेवून त्यावर जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करण्याचे प्रस्तावित काम आहे. म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या झाडांची १०० टक्के हानी होणार आहे. जॉगिग ट्रॅकसाठी हाकेच्या अंतरावर असणारे ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, गटाराचे काम सुरु असलेल्या शेजारीच अंर्तगत रस्त्यावर होणारे सकाळ संध्याकाळ होणारे जॉगिंग, प्रत्येक परिसरातील उद्यान व क्रिडांगणात असणारे जॉगिंग ट्रॅक पाहता हे काम नक्की जनतेच्या सुविधांसाठी होत नसून तत्कालीन नगरसेवकांच्या समाधानासाठी केले जात असण्याची दाट शक्यता आहे. एक पर्यावरणप्रेमी ग्रामस्थ म्हणून आपणास विनंती करतो की, आपण स्वत: या ठिकाणी येवून कामाची पाहणी करावी व पर्यावरणाची होत असलेली नासाडी थांबवावी. तसेच नियोजित जॉगिंग ट्रॅकचे काम थांबवून पर्यावरणाची आणखी नासाडी होणार नाही यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी मनोज मेहेर यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.