
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८७ मधील बकाल व अविकसित भुखंडाची सफाई करण्याची लेखी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ व ८ अ मध्ये माणक हॉस्पिटलजवळील भुखंड तसेच संजीवनी, उन्नती, त्रिमूर्ती व शिवनेरी अपार्टंमेंट या अपार्टमेंटच्या मागील बाजूस सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या भुखंडाच्या बकालपणामुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे भुखंड अविकसित अवस्थेत असून तेथे कचऱ्याचे, डेब्रिंजचे ढिगारे, रॅबिटचे ढिगारे आहेत. या भुखंडावर जंगली झुडूपे, गवत वाढीस लागले आहे. या अविकसितत भुखंड व तेथील जंगली झुडूपे यामुळे संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये साप, नाग व अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांचा सामना करावा लागत आहे. तेथील रहीवाशांच्या सदनिकामध्ये साप, नागाचे दर्शन होवू लागले आहे. त्यामुळे येथे जिवितहानी होण्याची भीती आहे. या भुखंडाची सफाई आम्ही वेळोवेळी कधी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून तर कधी स्वखर्चातून सफाई केलेली आहे. स्थानिक रहीवाशांना डासांचा व साथीच्या आजाराचाही या अविकसित भुखंडामुळे सामना करावा लागलेला आहे. समस्येचे गांभीर्य व स्थानिकांकडून केली जाणारी आग्रही मागणी पाहता आपण संबंधितांना शक्य तितक्या लवकर संबंधित अविकसित भुखंडाच्या सफाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.