
फिरस्ते, भिकाऱ्यांना कायमचा अटकाव
पनवेल संघर्ष समितीच्या मागणीला यश
पनवेल: कळंबोली उड्डाणपुलाखाली भिकारी, फिरस्त्यांची धोकादायक वस्ती निर्माण झाल्याने नागरिकांचा आक्रोश वाढत चालला होता. शिवाय अपघाताला निमंत्रण आणि मानवी तस्करीतून भीक मागण्यासाठी आणली जाणारी कोवळी बालके यामुळे कळंबोली वाहतूक बेट कुख्यातीच्या विळख्यात अडकत चालले आहे. त्यावर रामबाण उपाय काढत पनवेल संघर्ष समितीने सुचविलेला पर्याय मान्य करून तिथे लोखंडी जाळीचे कुंपण घालण्यास महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तयारी दर्शविली आहे.
पनवेल तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली मागे ठरल्याप्रमाणे आज बैठक संपन्न झाली. भिकारी, फिरस्त्यांची वस्ती, त्यातून अपघाताचा धोका, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आणि फुले विक्री, भीक मागण्यासाठी करण्यात आलेल्या मानवी तस्करीचा संशय लक्षात घेवून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केलेल्या मागणीला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी हिरवा कंदिल दर्शविला. त्यानुसार दोन दिवसात खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठांच्या परवानगीकरिता प्रस्ताव पाठविला जाईल. त्यानंतर आठवडाभरात पुढील कार्यवाही पूर्ण करून लोखंडी जाळीचे दोन्ही बाजूला कुंपण उभारण्याचे बैठकीत ठरले.
एमएसआरडीसीच्या निर्णयामुळे यापुढे भिकारी आणि फिरस्त्यांच्या अनधिकृत वस्तीला कायमचा अटकाव बसेल. त्यामुळे कळंबोली वाहतूक बेट मोकळा श्वास घेईल आणि वाहन चालकांनाही दिलासा मिळणार आहे.
नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी, मांडे, अवल कारकून एस. एन. राठोड, रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आर. पी. सिकंदर, सल्लागार शिरीष पोटे, भागवतराव वारेकर, दीपक मोरे, आयआरबीचे अधिकारी एम. एच. गांधी, पनवेल महापालिका प्रभाग अधिकारी प्रकाश गायकवाड, पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, पनवेल शहराध्यक्ष गणेश वाघिलकर, करंजाडे विभागीय अध्यक्ष मंगल भरवाड, उपाध्यक्ष रामाश्री चव्हाण, नेरे विभागीय अध्यक्ष सचिन पाटील आदी मान्यवर चर्चेत सहभागी झाले होते.
कामोठे बाह्यवळण पुलाखालीही कुंपण घालावे
…………………………………………………
कामोठे बाह्यवळण उड्डाणपुलाखाली अशाच तऱ्हेने लोखंडी जाळीचे कुंपण घातल्यास तिथे या वस्तीला हातपाय पसरायला मोकळीक मिळणार नाही, असा दावा करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तुर्भे कार्यालयाशी महापालिकेने संपर्क साधून काम करून घेण्याची वेगळी मागणी कांतीलाल कडू यांनी केली. त्या अनुषंगाने महापालिका प्रभाग अधिकारी प्रकाश गायकवाड पत्रव्यवहार करणार आहेत, असे ठरले.
फिरस्ते, भिकाऱ्यांना रोजगार हमी
योजनेतून हाताला काम द्या !
…………………………………..
कळंबोली वाहतूक बेट, पनवेल भाजी मार्केट तसेच तक्का दर्गा परिसरात बेकायदेशीर वस्ती निर्माण करून संसार थाटणाऱ्याचे रहिवासी पुरावे तपासून पाहावे. त्यातील बांगलादेशी असल्यास परतवून लावावे आणि भारतीय असल्यास रोजगार हमी योजनेत राबवून घ्यावे, असा प्रस्ताव कडू यांनी सूर्यवंशी यांच्यासमोर मांडला. त्यावर महापालिकेने तो विचार करावा असे म्हणत सूर्यवंशी यांनी महापालिकेला जबाबदारीची जाणीव करून दिली.