
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठविलेल्या ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेच्या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीत महाविकास आघाडीकडून मंजुरी देवून कामगारांना उपकृत करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आलेला आहे. महापालिका सेवेत काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यासाठी नवी मुंबई इंटकने महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पालिका शाळेत शिकविणाऱ्या ठोक मानधनावर गेली काही वर्षे शिकविणाऱ्या शि क्षकांचाही समावेश आहेे. त्यांचीही सेवा ठोक मानधनावरील अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लवकरात लवकर कायम होणे आवश्यक आहे. शिवसेनेनेही याप्रकरणी बहूमोल सहकार्य लाभल्याचे जगजाहिर आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख आहात. शिवसेना नेते तसेच कामगार प्रश्नांची जाण तसेच कळवळा असणारे नेतृत्व आहे. ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेबाबत आपणास अधिक सांगण्याची गरज नाही. आपण स्वत: या महापालिका स्थापनेपासून या शहराची जडणघडणीत सुरूवातीच्या काळातील शिवसेनेचाच पुढाकार पूर्णपणे जाणून आहात. या प्रश्नाची आपणास सखोल माहिती आहे. याप्रकरणी काँग्रेसचे नवी मुंबईतील काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणिस संतोष शेट्टी यांनीही पाठपुरावा करताना आम्हाला साथ दिलेली आहे. ते सतत आम्हाला मार्गदर्शन करत असतात. महापालिका व मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करत असताना ते सतत आमच्या सोबत असतात. हा ठराव नुकताच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी मंत्रालयात महापालिका प्रशासनाने पाठविलेला आहे. याप्रश्नी आम्ही इंटकच्या वतीने शिवसेना उपनेते विजय नाहटा व शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनाही निवेदन सादर केलेले आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटिवार यांनीही याप्रकरणी आपणास पत्र सादर केलेले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हेही याप्रकरणी पाठपुरावा करत असल्याचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आम्ही स्वत: काँग्रेसच्या माध्यमातून तसेच मंत्रालयातील काँग्रेसच्या मान्यवरांकडून या प्रश्नाला सातत्याने चालना देत आहोत. आपण स्वत: कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी पुढाकार घेवून संबधित ठोक मानधनावरील कामगारांना सहकार्य करावे. काँग्रेस नेते व विधानसभा अध्यक्ष नाना पटोळेसाहेब यांच्याच दालनात याविषयावर नवी मुंबई इंटकचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त व अन्य अधिकारी यांची त्यांच्याच उपस्थितीत बैठकही झालेली आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून आपण राज्याचे मुख्यमंत्री असून कामगार हितैषी आहात. या कामाला मंत्रालयीन बैठकीत मान्यता देवून गेली अनेक वर्षे रेंगाळलेली ही समस्या मार्गी लावण्यास आम्हाला सहकार्य करावे आणि ठोक मानधनावरील कामगारांना उपकृत करावे असे साकडे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना घातले आहे.