
नवी मुंबई : मालमत्ताकर थकबाकीदारासाठी महापालिकेने ‘अभय योजना’ जाहिर केली आहे. १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१दरम्यान ही योजना असणार असून थकबाकीदारांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यत सवलत देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने मालमत्ता कराबाबत अभय योजनेसाठी महापालिका ते मंत्रालयादरम्यान पाठपुरावा केल्यामुळेच नवी मुंबईकरांसाठी महापालिका प्रशासनाला अभय योजना लागू करणे भाग पडले असल्याचा दावा कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे.
गेल्या वर्षी महापालिका सभागृहात नवी मुंबईकरांना थकीत मालमत्ताकराचा भरणा सुलभपणे करता यावा व महापालिकेच्या तिजोरीतही भर पडावी यासाठी कॉंग्रेसचेप्रदेश चिटणीस संतोष शेट्टी व कॉंग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांकडे व विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्याकडे पाठपुरावा करून थकीत मालमत्ता कराबाबत नवी मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी केली. त्यानंतर कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. मिरा पाटील यांनी महापालिका सभागृहात आवाज उठविला होता. आयुक्तांकडेही आपले म्हणणे मांडले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने अभय योजना लागू केली. तथापि कोरोनाचे सावट सुरू झाल्यानंतर या अभय योजनेचा नवी मुंबईकरांना पूर्णपणे लाभ घेता आला नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांना थकीत मालमत्ताकराचा भरणा करता यावा यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देवून पुन्हा अभय योजना लागू करण्याची मागणी केली होती. रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणिस संतोष शेट्टी यांच्यासमवेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटिवार, नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला.
महापालिका प्रशासनाने अभय योजना लागू केल्यामुळे नवी मुंबईकरांना मालमत्ता कराचा भरणा करण्यास दिलासा मिळणार असून महाविकास आघाडीच्या घटकांनी पाठपुरावा केल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी सांगितले.