
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ मधील राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगणात जुनाट वीजव्यवस्था बदलून नवीन डेकोरेटिव्ह फिटींग बसवण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या उद्यान व क्रिडांगणात वीज व्यवस्था उपलब्ध असली तरी ती जुनाट पध्दतीची आहे. सभोवतालच्या उद्यान व क्रिडांगणामध्ये महापालिका प्रशासनाकडून डेकोरेटिव्ह फिटींग बसविली असताना सेक्टर सहामधील क्रिडांगण व उद्यानात मात्र महापालिका प्रशासनाकडून ही सुविधा पुरविण्यात आलेली नाही. नेरूळ सेक्टर ६ मधील सिडको सदनिकाधारक, साडेबारा टक्केतील रहीवाशी तसेच सारसोळेचे ग्रामस्थ महापालिकेत कराचा भरणा करत नाहीत काय? मग डेकोरेटिव्ह फीटींगची वीज सुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनातून केला आहे.
सकाळी मॉर्निग वॉक करावयास प्रभाग ८५ व ८६ मध्ये केवळ याच उद्यान व क्रिडागणांमध्ये सर्वाधिक संख्येने रहीवाशी व ग्रामस्थ चालावयास येत असतात. या ठिकाणी स्पीकर यंत्रणा बसविण्यासाठी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतानाही सेक्टर सहाच्या रहीवाशांना व सारसोळेच्या ग्रामस्थांनाही ही सुविधा देण्यासही पाठपुरावा केल्यानंतरही टाळाटाळ केली जात आहे. या उद्यानातील खेळणी (बदक) तुटलेली असतानाही गेली अडीच वर्षे ती खेळणी दुरूस्त करण्यासही टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्न मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनातून केला आहे.
उद्यानात व क्रिडांगणात डेकोरेटीव्ह फीटींग बसविण्यात यावी, उद्यानातील खेळणी दुरूस्त व्हावी., उद्यान व क्रिडांगणात स्पीकर यंत्रणा बसवण्यात यावी यासाठी पुन्हा या निवेदनातून आपणास साकडे घालत आहोत. इतर ठिकाणी सुविधा देत असताना नेरूळ सेक्टर सहा व सारसोळेच्या ग्रामस्थांवर पालिका प्रशासनाने अन्याय करू नये असे साकडे मनोज मेहेर यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांना घातले आहे.