
स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील महापालिका उद्यानाची वेळ वाढवून देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक नोडमध्ये, विभागाविभागामध्ये महापालिकेची उद्याने आहेत. या उद्यानाच्या डागडूजीसाठी महापालिका प्रशासन दरवर्षी अर्थसंकल्पात करोडो रूपयांची तजवीज करण्यात येत असते. उद्यानातील सुशोभीकरण व खेळणी, सीसीटीव्ही, संगीत यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा यावरही खर्च होत असतो. महापालिका प्रशासनाकडून सध्या उद्यानाची सकाळी ५.३० ते १० तर सांयकाळी ५ ते ९ ही वेळ आहे. सांयकाळी कामावरून आलेले नवी मुंबईकर जेवण करून उद्यानात रात्रीच्या वेळी फिरावयास येत असतात. रात्री ९.३० वाजेपर्यत सर्वसामान्यांचे जेवण होत असते. जेवण करून परिवारासह ज्यावेळी नवी मुंबईकर उद्यानात येत असतात. उद्याने त्यावेळी बंद झालेली असतात. सकाळी ५.३० वाजता उद्याने उघडण्यात येतात, त्याऐवजी ती सकाळी ५ वाजता उघडल्यास नवी मुंबईकरांना अधिकाधिक वेळ शुध्द हवा घेता येईल. याशिवाय उद्याने लवकर सुरू झाल्यास त्यांना ६.३० ते ७ वाजता कामावर जाणेही शक्य होईल. रात्रीच्या वेळी ९ वाजता उद्याने बंद न करता ती रात्री १०.३० वाजता बंद केल्यास नवी मुंबईकरांना रात्री १ तास कुटूंबासोबत उद्यानात फिरता येईल. आपण नवी मुंबईकरांच्या हितास्तव उद्यानाची वेळ सकाळी ५ ते ११ आणि सांयकाळी ५ ते रात्री १०.३० पर्यत करण्यात यावी, जेणेकरून नवी मुंबईकरांना उद्यानाचा खऱ्या अर्थाने लाभ घेता येईल. नवी मुंबईकरांकडून उद्यानाची वेळ वाढविण्याबाबत सातत्याने होत असलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून त्यांना उद्यानाचा अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी संबंधितांना उद्यानाची वेळ वाढवून देण्याचे निर्देश देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.