
स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : प्रभाग ८७ मधील गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका घनकचरा उपायुक्तांकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ आणि १० या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या व माथाडी कामगारांची वसाहत यांचा समावेश होत आहे. हा अल्प तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील रहीवाशांचा परिसर आहे. महापालिका प्रशासनाकडून गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्यात येत असतात. सध्या महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मागील वर्षी नवी मुंबई शहराचा देशामध्ये तिसरा क्रमांक आला होता, यावर्षी प्रथम क्रमांक यावा महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांचे कचरे डब्बे सध्या तुटलेले आहेत. महापालिका प्रशासनाकडून सोसायटीतून रस्त्यावर उभ्या असलेल्या कचरा वाहक वाहनापर्यत ते डब्बे नेताना कचरा पडलेला असतो. त्यामुळे परिसराला बकालपणा येवून सुशोभीकरणाला अडथळे येतात. स्वच्छता अभियानाचे गांभीर्य ओळखून गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका घनकचरा उपायुक्तांकडे केली आहे.