
नवी मुंबई : न्हावासेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, सारसोळे आणि वाशी येथील मच्छिमारांना लवकरच नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या संदर्भात एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ.के.एच. गोविंदराज यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार, लवकरच नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन के.एच. गोविंदराज यांनी दिल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केले .
एमएमआरडीएच्या बहुचर्चित न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील दिवाळे, सारसोळे, वाशी येथील मोठे नुकसान होणार आहे. या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सौ. मंदाताई म्हात्रे यांनी गेल्या वर्षी संबधित विभागाकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी अलीकडेच एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ.के.एच. गोविंदराज यांची भेट घेऊन चर्चा केली. एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या ४६0 मच्छीमारांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. त्यानुसार, या संदर्भात पंधरा दिवसांत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीकडून स्पष्ट करण्यात आल्याचे सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. दोन टप्प्यात नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचेही एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ अभियंता गणेश देशपांडे, भाजप युवामोर्चा महामंत्री जगन्नाथ कोळी, अनंता बोस, तुकाराम कोळी, प्रेमनाथ कोळी, सुनील बाये, कैलास कोळी, ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते.
००००००००००००००००००००००००००००० ००००००००००००००००००००००००
सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मागील दीड वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील मच्छीमारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मच्छीमारांची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी आपली भूमिका आहे. त्यानुसार, एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, पुढील पंधरा दिवसांत टप्प्याटप्प्याने भरपाई वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.
सौ : मंदाताई म्हात्रे, आमदार