
स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई: महिलांना स्वत: दुचाकी वाहने चालविता यावी, त्यांनी घरातील कामासाठी अथवा कार्यालयीन कामासाठी कोणावर अवलंबून राहू नये तसेच त्यांना संगणकाचे जुजबी ज्ञान असावे यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव श्रीमती विद्या भांडेकर व सौ गौरी रविंद्र सावंत यांच्या माध्यमातून नेरूळ तालुका कॉंग्रेसच्यावतीने प्रभाग ८२ व ८४ मधील महिलांसाठी मोफत स्कुटी प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय सध्याच्या संगणकीय युगात महिलांना संगणकाचे ज्ञान अवगत असावे म्हणून कॉंप्युटरचे बेसिक ट्रेनिंग दिले जाणार आहे. प्रभाग ८२ व ८४ मधील नेरूळ व जुईनगरमधील महिलांसाठी कॉंग्रेस पक्ष निर्मला महिला मंडळाच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती उपक्रमाच्या आयोजक विद्या भांडेकर यांनी दिली.
नेरूळ सेक्टर दोनमधील दत्तात्रेय सोसायटीमधील कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात १ जानेवारी २०२१ पासून या अभिनव उपक्रमास सुरूवात होत असून यामध्ये महिलांना मोफत स्कूटी व संगणक प्रशिक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोफत स्कूटी प्रशिक्षणामध्ये केवळ प्रथम २० येणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या निकषावर नावनोंदणी करणाऱ्या पहिल्या २० महिलांना या मोफत स्कूटी प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. कॉम्प्युटरच्या बेसिक ट्रेनिंगमध्ये नावनोंदणी करणाऱ्या सर्वच महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रभाग ८२ व ८४ मधील जुईनगर व नेरूळमधील महिलांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन विद्या भांडेकर यांनी केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी विद्या भांडेकर – ९७०२६०५३२१, ८३६९४२१२३२ यांच्याशी संपर्क साधावा.