संदीप खांडगेपाटील : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ मधील नेरूळ सीव्ह्यू या सिडको सोसायटीलगत असलेल्या उद्यानाचे नामकरण फलक लावणेबाबत अन्यथा आठवडाभरात राष्ट्रवादीकडून उद्यानाचे नामकरण करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रय नांगरे यांना दिला आहे.
प्रभाग क्रमांक ८५ मधील नेरूळ सेक्टर ६ मध्ये महानगरपालिकेचे नेरुळ सीव्ह्यू या सिडको सोसायटीलगतच उद्यान आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाकडून या उद्यानात नेहमीच डागडूजीची अथवा सुशोभीकरणाची कामे होत असतात. नव्याने उद्यानाला कमानही बसविण्यात आलेली आहे. परंतु खेदाची बाब म्हणजे आजतागायत या उद्यानाचे नामकरण झालेली नाही. उद्यानाला अद्यापि नामफलकही लागलेला नाही. त्यामुळे या उद्यानाचे नेमके नाव काय आहे, नाव कधी देण्यात आले याबाबत काहीही उलगडा होत नसल्याचे महादेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
स्थानिक परिसरातील प्रविण तानाजी येलकर हा युवक भारतीय सैन्य दलात होता. सीमेवर त्याला हौतात्म्य प्राप्त झाले. स्थानिक परिसरातील युवकांच्या हौतात्म्याची आठवण सदैव राहावी यासाठी या उद्यानाला त्यांचे नाव देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावाही केला. तथापि या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे सौजन्य न दाखविता केराची टोपली दाखविण्याची तत्परता महापालिका प्रशासनाकडून दाखविण्यात आली. आपण उद्यानाकडे आल्यास हे नामफलकाची वाट पाहत असलेले बेवारस अवस्थेत असलेले निदर्शनास येईल. या उद्यानाला महापालिका प्रशासनाने जे नाव दिले आहे. ते तात्काळ नामफलकावर लावावे. मात्र या नामकरणाविषयी ठराव महापालिकेत कधी संमत केला याबाबत स्थानिकांना माहिती मिळणे आवश्यक आहे. महापालिकाला प्रशासनाला आम्ही १०दिवसाची मुदत देत आहोत. ४ जानेवारीपर्यत महापालिका प्रशासनाने उद्यानाला नामफलक न लावल्यास ६ जानेवारीला पत्रकार दिनी आम्ही पत्रकारांच्या हस्ते या उद्यानाला ‘शहीद प्रविण तानाजी येलकर उद्यान’ असा नामफलक लावू व शहिदाचे नाव असलेला नामफलक आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणालाही काढू देणार नाही. यातून कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.