संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या काही दिवसापासून वर्तविण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाट महाभयावह राहणार असल्याचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. नवी मुंबईत कोरोना आज उद्रेकाच्या उंबरठ्यावर येवून पोहोचला आहे. बुधवार, दि. १७ मार्च रोजी महापालिका प्रशासनाकडून प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार ३१८ नवी मुंबईकरांना कोरोनाची नव्याने लागण झाली असून ३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर १३५ कोरोनाग्रस्त कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
आजच्या ३१८ कोरोनाग्रस्तांमध्ये वाशी विभागात सर्वाधिक म्हणजे ५३ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. बेलापुर विभागात कोरोनाचे ४४ रूग्ण, नेरूळ विभागात कोरोनाचे ४३ रूग्ण, तुर्भे विभागात कोरोनाचे ३७ रूग्ण, कोपरखैराणे विभागात कोरोनाचे ५२ रूग्ण, घणसोली विभागात कोरोनाचे ४१ रूग्ण, ऐरोली विभागात कोरोनाचे ४५ रूग्ण तर दिघा विभागात ३ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.
आज ७५२ नवी मुंबईकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड अॅंण्टीजेन टेस्ट करून घेतली. आजवर ३ लाख १५ हजार १८३ लोकांनी ही टेस्ट करून घेतली आहे तर ५ लाख ९० हजार ९२३ लोकांनी आजवर कोव्हिड १९ चाचणी आजवर करून घेतली आहे. कोरोनाने आज तीनशेचा आकडा ओलांडताच नवी मुंबईकरांचा खऱ्या अर्थाने काळजाचा ठोका चुकला आहे. सार्वजनिक जागी वाढलेली गर्दी, मार्जिनल स्पेस तर सोडा मार्जिनल स्पेससमोरील पदपथावरही दुकानचालकांचे अतिक्रमण, ग्राहकांसह दुकानमालक विना मॉस्क करत असलेले व्यवहार, पदपथावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या कचराकुंड्यांची दुर्गंधी, स्वच्छतेबाबत आयुक्तांच्या सूचनांना पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीच दाखविलेली केराची टोपली यामुळे कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. आजची आकडेवारी ‘अब की बार तीनसौ पार, कोरोनाच्या उद्रेक पोहोचला आता शहराच्या कानाकोपऱ्यात’ ही भीती आता नवी मुंबईकरांच्या चेहऱ्यावर उघडपणे पहावयास मिळू लागली आहे.