संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : कॉंग्रेस पक्ष एकेकाळी देशाच्या कानाकोपऱ्यातील मातब्बर पक्ष. केंद्रासह विविध राज्यात कॉंग्रेसच सत्तेवर होती, पण आता जनाधार घटल्यामुळे कॉंग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. नवी मुंबईतही हेच चित्र आहे. एकेकाळी महापालिका सभागृहात विषय समिती सभापती, विरोधी पक्षनेतेपद भूषविणाऱ्या कॉंग्रेसला आगामी महापालिका निवडणूकीत दोन आकडी संख्याबळ गाठणे अवघड जाणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विसर्जित महापालिका सभागृहात असणाऱ्या कॉंग्रेसचे तीन भगत, वाळूंजासह भाजपाच्या कमळात गेल्याने कॉंग्रेसलाही घरघर लागली आहे. कौशिक, शेट्टी, म्हात्रे, पाटील, लाड या मोजक्याच सरदारांनी नवी मुंबईत कॉंग्रेस ओळखली जात असली नवी मुंबईत कॉंग्रेस पक्षसंघटना ही केवळ रवींद्र सावंत या एकमेव नावानेच ओळखली जात आहे. सततची आंदोलने, निदर्शने व पालिका ते मंत्रालय सतत सर्वसामान्यांसाठी पाठपुरावा अशा विविध कारणामुळे रवींद्र सावंत म्हणजेच नवी मुंबई कॉंग्रेसचा चेहरा अशी ओळख नवी मुंबईतच नाही तर खाडीच्या पलिकडे मुंबई क्रमांक ४०००२१च्याही परिसरात निर्माण झालेली आहे.
काही माणसांना पदामुळे शोभा येते, तर काही पदांना त्या माणसांमुळे शोभा येते. रवींद्र सावंत हे दुसऱ्या पठडीत मोडणारे नेतृत्व आहे. कार्यकर्ता ते नवी मुंबईतील कॉंग्रेसचा नेता अशी रवींद्र सावंत यांची सहजासहजी ओळख निर्माण झालेली नाही. त्यांना अहोरात्र संघर्ष करावा लागला आहे, पालिका प्रशासन ते मंत्रालय चपला झिजवाव्या लागल्या आहेत. सर्वसामान्यांच्या कामांसाठी पालिका अधिकाऱ्यांच्या दालनापासून मंत्रालयात असणाऱ्या मंत्र्यांच्या केबिनपर्यत रवींद्र सावंत यांना गेल्या काही वर्षात चपला व टाचा दोन्ही घासाव्या लागल्या आहेत.
कार्यकर्ता, नेरूळ ब्लॉक अध्यक्ष, रोजगार व स्वंयरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष, नवी मुंबई जिल्हा इंटकचे अध्यक्ष अशा विविध पदावर कार्यरत असणारे रवींद्र सावंत नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहेत, तसेच अनुभवलेलेही आहेत. राजकारणी व कामगार नेता अशी निर्माण झालेली प्रतिमा जोपासत रवींद्र सावंत यांनी गेल्या काही वर्षात कॉंग्रेसच्या पाठीमागे जनाधार उभा करण्याचे काम इमानेइतबारे केलेले आहे.
कोरोना महामारीच्या काळात खऱ्या अर्थाने रवींद्र सावंत यांचे कार्य प्रकाशझोतात आले. केवळ कॉंग्रेसच्याच नाही तर अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांचीही त्यांनी कोरोनाविषयक कामे करून दिली. कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी रूग्णालयीन प्रवेश, ने-आण करण्यासाठी रूग्णवाहिका, आयसीयू तसेच व्हेन्टिलेटर यासह सर्वच कामे रवींद्र सावंत यांनी संपर्कात आलेल्या अनेकांची करून दिली. नेरूळ, जुईनगर, बेलापुर, वाशी, ऐरोली, कोपरखैराणे भागातून अनेकांची गेल्या सव्वा वर्षात रवींद्र सावंत यांनी मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची उपचारासंदर्भात कामे रवींद्र सावंत यांनी करून दिली. नेरूळ-जुईनगर परिसरात गरजूंना अन्नदान केले. रवींद्र सावंत यांनी आपल्या ओळखीच्या बळावर आजवर हजाराहून अधिक युवकांना ऱोजगार मिळवून दिलेला आहे.
नवी मुंबईत इंटक नावाची कामगार संघटना यापूर्वी कोणाच्या ध्यानीमनीही नव्हती. किंबहूना कॉंग्रेस पक्षाची अशी कोणती कामगार संघटना अस्तित्वात आहे, हे नवी मुंबईतील अनेकांना माहितीही नव्हते. तथापि रवींद्र सावंत यांच्यावर कॉंग्रेस पक्षाने नवी मुंबई जिल्हा इंटक अध्यक्षपदाची धुरा सोपविली. या पदाच्या माध्यमातून कामगारांसाठी कार्य करताना नवी मुंबईत इंटक संघटना नावारूपाला आली आणि कामगार वर्गामध्ये आकर्षितही झाली. कामगारांच्या समस्या सोडविताना, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देताना पालिका प्रशासन ते मंत्रालय रवींद्र सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे इंटक, रवींद्र सावंत व पर्यायाने कॉंग्रेस पक्ष कामगार वर्गात नावारूपाला आला व कामगार वर्गही या तिघांकडे आकर्षिला गेला. रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे कामगारांच्या प्रश्नांवर केलेल्या पाठपुराव्यामुळेच महापालिका प्रशासनाला कामगारांबाबतचे अनेक ठराव बनवून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावे लागले आहेत. या ठरावांना मंजुरी मिळावी म्हणून केवळ कॉंग्रेसच्याच नाही तर महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याही मंत्र्यांच्या व नेत्यांच्या भेटीगाठी घेत रवींद्र सावंत यांनी राज्य सरकारने महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावांना लवकर मंजुरी द्यावी यासाठी आपल्या चपला त्यांच्या कार्यालयात झिजविल्या आहेत.
गेल्या तीन-साडे तीन दशकांमध्ये कॉंग्रेसला अनेक रथी-महारथी नेते मिळाले आहेत. पण कॉंग्रेस पक्षसंघटनेचे सुगीचे दिवस असताना या नेतेमंडळींनी नावलौकीकही मिळविला. कॉंग्रेसकडे जनाधाराने पाठ फिरविल्यावर कॉंग्रेसला ओहोटी लागली. त्याबरोबर अनेक नेतेमंडळींनी आपली राजकीय वहीवाटही बदलली. परंतु कडवट कॉंग्रेसी विचारांच्या रवींद्र सावंतांनी कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत केले. रवींद्र सावंत हे त्यांच्या कार्याच्या पाठबळावर कार्यकर्ता ते नेता अशी वाटचाल करत असले तरी त्यांच्यातील कार्यकर्ता आजही जिवंत असल्याने त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. केवळ कार्यकर्ता नाही तर आंदोलनात्मक कार्यकर्ता असा त्यांचा पिंड असल्याने त्यांच्या माध्यमातून नवी मुंबईत अनेक आंदोलने कॉंग्रेसने गेल्या काही महिन्यात केली आहेत. रवींद्र सावंत यांच्या पुढाकारातून, त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने आंदोलने, निदर्शने केल्यामुळे कॉंग्रेस पक्षाची कधी नव्हे ती नव्हे नवी मुंबईत प्रथमच आंदोलनात्मक प्रतिमा निर्माण झालेली आहे.
चीनच्या भारतीय सीमेवर कुरापती वाढू लागल्यावर व सीमेवरील सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागत असल्याचे पाहून १८ जुन २०२० रोजी सर्वप्रथम रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याना घेवून चीनचा झेंडा रस्त्यावर जाळत चीनविरोधात निदर्शने केली. १ ऑक्टोबर २०२० रोजी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की होताच रवींद्र सावंत यांनी त्याविरोधात सायन-पनवेल महामार्गावर जुईनगर येथे उतरून बराच वेळ रास्ता रोको करत वाहतुक अडवून ठेवली होती. केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांबाबत बनविलेल्या अन्यायकारक कृषी कायद्याच्या विरोधात रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यासमवेत जुईनगर येथील चिंचोली तलावात उतरून ५ नोव्हेंबर २०२० रोजी निदर्शने केली होती. ८ डिसेंबर २०२० रोजी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारने बनविलेल्या अन्यायकारक कामगार कायद्याच्या विरोधात रवींद्र सावंत यांनी निदर्शने केली होती. कोरोना महामारीच्या विरोधात लस तळागाळातील जनतेला लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी १० एप्रिल २०२१ रोजी थाळीनाद आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रवींद्र सावंत यांनी केला. कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून कॉंग्रेस कार्यालयात रवींद्र सावंत यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. २७ मे २०२१ रोजी पेट्रोल, डिझेल व गॅसदरवाढीच्या विरोधात नेरूळ सेक्टर ६ मधील पामबीच मार्गालगतच्या पेट्रोलपंपावर रवींद्र सावंत यांनी निदर्शने केली. ३० मे २०२१ रोजी वाढत्या महागाईच्या विरोधात नेरूळमध्ये निदर्शने करताना रवींद्र सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाळला. मध्यंतरी कॉंग्रेस पक्षाने भाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे निर्देश कार्यकर्त्याना व पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यावेळी नवी मुंबईत केवळ रवींद्र सावंत यांनी भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या घरासमोर घोषणा देत निदर्शने केली होती. अन्य कोणा कॉंग्रेसी नेत्यांची मंदाताईंच्या घरासमोर घोषणाबाजी व निदर्शने करण्याची धमक नसताना ती हिंमत केवळ रवींद्र सावंत यांनी दाखविली.
नवी मुंबईत कॉंग्रेस पक्षाने चार प्रवक्ते नियुक्त केले असताना प्रवक्तेपदाला सर्वाधिक न्याय रवींद्र सावंत यांनीच दिलेला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जवळून पाहिले आहे. प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम करताना रवींद्र सावंत यांनी प्रयत्न केले आहे. रवींद्र सावंत हा नवी मुंबई कॉंग्रेसचा गेल्या काही महिन्यात चेहरा बनला आहे. मंत्रालयीन पातळीवर तसेच कॉंग्रेसच्या प्रदेश नेत्यांकडेही रवींद्र सावंत म्हणजेच नवी मुंबई ही ओळख निर्माण होवू लागली आहे. अर्थात बहूजन वर्गातील सर्वसामान्य घरातून वर आलेल्या युवकाने राजकारणात प्रगती करणे ही प्रस्थापित कॉंग्रेस नेतेमंडळींच्या बाब पचनी पडणे अवघड आहे. त्यामुळे रवींद्र सावंत यांच्या कार्यात अडथळे आणण्याचे काम काही कॉंग्रेसी घटकांनी पडद्याआडून सुरू केले आहे. परंतु ते सावंत यांचे नाही तर कॉंग्रेस पक्षाचेच नुकसान करत आहेत, इतकेही त्यांच्या ध्यानात येत नाही. मधल्या काळात आपल्या कार्याच्या बळावर सावंत यांनी जनसामान्यात तसेच पक्षसंघटनेत आणि नेतेमंडळींमध्ये आपला खुटा मजबूत केलेला आहे. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांना नेरूळ कॉंग्रेस कार्यालयात आणून कोरोनाने मृत झालेल्या कॉंग्रेस वॉर्ड अध्यक्षाच्या परिवाराला त्यांच्या हस्ते मदत देण्याची किमया सावंत यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या पडझडीच्या काळात नवी मुंबई कॉंग्रेसमधील मातब्बर सुस्तावलेले असताना रवींद्र सावंत या एकखांबी नेतृत्वाने आंदोलने, निदर्शने करत मिडीयालाही आपल्या पर्यायाने कॉंग्रेसच्या अस्तित्वाची दखल घेणे भाग पाडले आहे.