संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.coom – Sandeepkhandgepatil@gmail.com
पनवेल / नवी मुंबई : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवार, १७ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा तसेच नवी मुंबईचा दौरा आहे. ते जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तीकारांबरोबर बैठक, भूमिपूत्रांशी संवाद, त्याचबरोबर आंदोलनातील व्यक्ती व परिवाराचा सत्कार करणार आहेत.
या यात्रेत भाजपाचे ज्येष्ठ नेते, जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेते तसेच लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे. भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेची जय्यत तयारी सुरू असून, भाजपाच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. यात्रेच्या नियोजनाबाबत विविध बैठका सुरू असून, पद्धतशीरपणे नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त समाजघटकांना जोडून घेत नागरिक व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.रायगड जिल्ह्यातील जन आशिर्वाद यात्रेला १७ ऑगस्ट रोजी अलिबाग येथून सुरुवात होणार आहे. यामध्ये सर्वप्रथम ते सकाळी ८. ३० वाजता अलिबाग कोविड रुग्णालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर अलिबाग विश्रामगृह येथे सकाळी ०९ वाजता पत्रकार परिषद आणि सकाळी १० वाजता लाभार्थी व मच्छिमारांची भेट, त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन, भाग्यलक्ष्मी हॉल येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा, चरी येथे आंदोलनातील व्यक्ती व त्यांच्या परिवाराचा सत्कार सोहळा, आणि त्यानंतर ते पेणकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी १२. ४५ वाजता पेण येथे आमदार रवीशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकारांची भेट, त्यानंतर पनवेलकडे रवाना होत असताना दुपारी ०२. १५ वाजता शिरढोण येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारकास भेट देऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३. ०० वाजता पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३. १० वाजता आगरी समाज सभागृहात लाभार्थी भेट कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ०४. ३० वाजता उरण तालुक्यातील जासई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करून लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालय येथे प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५. ३० वाजता नवी मुंबईतील जन आशिर्वाद यात्रेच्या कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत.