नवी मुंबई : कामगार नेते आणि नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रवींद्र सावंत यांच्या हस्ते स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना पुष्पहार घालण्यात आला. यावेळी रवींद्र सावंत यांच्यासह जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, उदेग साळुंखे, मंगेश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी आपल्या छोटेखानी मार्गदर्शनपर भाषणातून नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी स्व. राजीव गांधी यांच्या कार्याचा आढावा घेताना राजीव गांधींचा संगणक युगाचे भारतातील प्रणेते असा केला. राजीव गांधी यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीने आजपासून विभागातील रहीवाशांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू असून घरातील महिलांना व अन्य लोकांनाही संगणकाचे ज्ञान असावे, मुलगा काय शिक्षण घेत आहे, याची जुजबी माहिती असावी यासाठी सर्वासाठीच मोफत संगणक प्रशिक्षण अभियान सुरू केल्याचे रवींद्र सावंत यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करताना कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती संबंधितांना दिली.