संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोपरखैराणे नोड येथील प्रभाग ४२ मधील सेक्टर २२ आणि २३ मधील वाहतुक कोंडीवर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोपरखैराणे नोड येथील प्रभाग ४२ मधील सेक्टर २२ आणि २३ मध्ये आपण फेरफटका मारल्यास आपणास रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने पार्क केलेली पहावयास मिळतील. कोपरखैराणे सेक्टर २२ आणि २३ हा पूर्णपणे निवासी वसाहतीचा परिसर आहे. दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात असल्याने वाहतुक कोंडीची समस्या गंभीर रूप धारण करू लागली आहे. दोन्ही बाजूला वाहने उभी राहील्याने पदपथ त्याआड झाकले जात आहे. त्यामुळे काही वर्षापूर्वी बेलापुरमध्ये वाहनांच्या आड महिला अत्याचाराची घटना घडली होती, तशी घटना येथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय दोन्ही बाजूला वाहने उभी असल्याने अग्निशमनचे वाहन, रूग्णवाहिका, कचरा संकलन करणारी वाहने यांना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. वाहतुक कोंडी कायम राहील्यास रूग्णवाहिकेतून जाणाऱ्या रूग्णाला उपचारासाठी विलंब होईल अथवा रूग्णापर्यत पोहोचण्यासाठी रूग्णवाहिकेला विलंब झाल्यास जिविताला धोका निर्माण होण्याची भीती आहे. याशिवाय अग्निशमनचे वाहन घटनास्थळी लवकर न पोहोचल्यास दुर्घटनेत वित्त व जिवितहानी अधिक होण्याची शक्यता आहे. दुतर्फा पार्किगमुळे स्थानिक रहीवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या समस्येवर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढणे अपेक्षित आहे. यावर आपण पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी नो पार्किग तर काही ठिकाणी समविषम पार्किग योजना लागू करावी. तसेच योजना लागू झाल्यावरही मनपा फलकांवरील सूचनांचे कोणी पालन करत नसेल तर टोईंग करून वाहने उचलून न्यावीत. प्रभागात रस्त्यावरील वाहन पार्किगची समस्या वाहतुक कोंडीला, परिसराच्या बकालपणाला खतपाणी घालत असल्याने पालिका प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.